esakal | कोरोना काळात जनतेने बाळगलेला संहिष्णूता व एकात्मता खऱ्या अर्थाने लोकशाही मुल्यांचा गौरव- अशोक चव्हाण  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भारतीयांनी नागरिक म्हणून जो संयम, धैर्य, संहिष्णूता आणि एकात्मता दाखविली ती खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही मुल्यांचा गौरव करणारी आहे,

कोरोना काळात जनतेने बाळगलेला संहिष्णूता व एकात्मता खऱ्या अर्थाने लोकशाही मुल्यांचा गौरव- अशोक चव्हाण  

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन आपण साजरा करीत असतांना मागील 71 वर्षांच्या संचितापेक्षा गत एक वर्षात जे काही अनुभवले, जे काही पाहिले, जे काही सोसले ते मागे वळून पाहिले तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही. मात्र या कठीण कालावधीत संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतीयांनी नागरिक म्हणून जो संयम, धैर्य, संहिष्णूता आणि एकात्मता दाखविली ती खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही मुल्यांचा गौरव करणारी आहे, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकांचा गौरव केला.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते.  यावेळी महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा  मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, स्वातंत्र्य सैनिक, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी व वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.  

राज्यघटनेच्या या मूलतत्वावर लोककल्याणकारी राज्याची भूमिका आपण स्विकारुन राज्याच्या प्रत्येक भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकिय योजनांना आकार दिला आहे. शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून विकासासाठी प्रतिक्षेत असलेल्या जनतेला न्याय देण्यासाठी आपण प्रशासनाची, विविध विभागांची निर्मिती केली आहे. या सर्व यंत्रणेमार्फत आपण नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामांना चालना दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावे यादृष्टीने आम्ही निर्णय घेतला असून आता नांदेड ते जालना पर्यंतचा साधारणत: 194 किमीचा स्वतंत्र समृद्धी मार्ग केला जाणार आहे. हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रिटचा सहा पदरी असून यास अंदाजे सहा हजार 500 कोटी रुपये खर्च येईल. मार्गामुळे धर्माबाद येथून नांदेडपर्यंत अवघ्या एका तासात येणे शक्य होणार आहे. नांदेड येथून जोडल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत अडीच तासात नांदेड येथून औरंगाबादला पोहचता येईल. मुंबईला जाण्याचा प्रवासही यामुळे अवघ्या सात तासात जलद आणि सुरक्षितरितीने नांदेडवासियांना करता येईल, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.    

धर्माबाद येथे रेल्वे उड्डाणपूल, भुयारी रेल्वेपूल अशा 170 कोटी रुपयांच्या कामांसह एशिएन डेव्हलमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा-आसनापूल-मुगट-कारेगावफाटा ते बासर येथील ट्रीपल आयटीपर्यंत जवळपास एक हजार 325 कोटीचा रस्ता लवकरच हाती घेऊन याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.  

कोरोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणखी काही काळ आपल्याला द्यावा लागणार आहे. कोरोनाचे प्रमाण कमी जरी झाले असले तरी त्याचा धोका अजून टळलेला नाही हे नागरिकांनी निट लक्षात घेऊन काळजी घेतली पाहिजे. कोरोनाची लस जिल्ह्यातील गरजूवंतापर्यंत पोहोचावी यादृष्टिने आरोग्य विभागातर्फे आपण नियोजन केले आहे. पहिल्या फेरीत आरोग्य विभागात व कोरोना व्यवस्थापन आणि नियंत्रण संदर्भात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देत आहोत. कोरोनावरची लस ही सक्षम असल्याने आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने लसीकरणासाठी तयार रहावे, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

loading image