Nanded News : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक येथे वाहतुकीची समस्या अनेक दिवसांपासून जटील बनली आहे. साठे चौक हा शहरातील मध्यवर्ती भागातील रहदारीचा मार्ग असणारा चौक आहे. परंतु, येथील सिग्नल नादुरुस्त असल्यामुळे रोज वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, नागरिक तासानतास या कोंडीत अडकून पडत आहेत.
शहरातील अण्णा भाऊ साठे चौक हा भाग शहरातील मध्यवर्ती भागातील रहदारीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. शहराच्या बाहेर जाण्यासाठीसुद्धा या मार्गाचा वापर केला जातो. रेल्वेस्टेशन, बसस्थानक, शासकीय रुग्णालय तसेच इतर शासकीय कार्यालयांत जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो.
रहदारीचा विषय पाहता या चौकात वाहतूक यंत्रणा सक्षम नसल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. एकदा वाहने अडकली की त्या वाहनाला निघायला बराच अवधी लागतो. या चौकात पोलिस कर्मचाऱ्यांचासुद्धा तुटवडा जाणवतो. बऱ्याच वेळी या ठिकाणी कोणताच पोलिस कर्मचारी उपस्थित नसतो. त्यामुळे या चौकात वाहनांची रांग लागलेली पाहावयास मिळते.
या चौकात ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित नसल्यामुळे वाहतुकीस थांबा किंवा दिशा मिळत नाही. यामुळे एक ते दोन कर्मचाऱ्यांच्या जोरावर वाहतुकीचे नियोजन करण्यात येते. परंतु, योग्य नियोजन, यंत्रणा आणि पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे रोज वाहतुकीस अडथळा होत आहे.
अण्णा भाऊ साठे चौकात ट्रॅफिक सिग्नल आहे. चार ते पाच दिवसांत त्याची दुरुस्ती करून कार्यान्वित करण्यात येईल. काही झाडाच्या फांद्या सिग्नलवर आडव्या आल्या असून, त्यासुद्धा बाजूला करण्यात येणार आहेत. वाहतूक प्रशासन शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
— साहेबराव गुट्टे, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा.
नांदेड शहरातील वजिराबाद ते राज कॉर्नर मार्गावर तसेच साठे चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होत आहे. यामध्ये वाहने अडकल्यानंतर तेथून लवकर बाहेर पडणे अवघड झाले आहे. यामुळे इच्छितस्थळी पोचण्यासाठी विलंब होतो.
— गिरीश रघोजीवार, नागरिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.