दुर्देवी घटना : सहस्त्रकुंड धबधब्यात घेतलेल्या उड्यांच्या शिंतोड्यास जबाबदार कोण?

file photo
file photo

हदगांव (जिल्हा नांदेड) : येथील कवानकर या व्यापारी कुटुंबातील दाम्पत्याने स्वतः सह आपली पत्नी, दोन मुली व एकुलत्या एका मुलासह सहस्त्रकुंड येथील धबधब्यात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. एवढा मोठा धाडसी निर्णय घेण्यामागील कारण काय असावे ? याचा शोध घेणे पोलिसांसमोर फार मोठे आव्हान असले तरीपण याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. कारण दररोज घरी आपण व आपले कुटुंब स्नान करत असतांना गरम पाण्याचा वापर करतो. थंड पाण्यात हात जरी बुडवून पहा म्हटलं तर हात बुडवण्यासाठी आपण मागे पुढे पाहतो तर मग एवढ्या गार पाण्यात तेही एवढ्या मोठ्या प्रचंड सहस्त्रकुंड धबधब्यात आत्महत्या करण्याच्याच उद्देशाने संपुर्ण कुटुंबासह घेतलेल्या उड्या खरोखरच ही घटना पटण्यासारखी आहे का याबाबत तर्कवितर्क काढण्यासारखेच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणारे नाही.

घडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. अशा घटना होऊच नयेत, आपला कोणी विरोधक किंवा कट्टर शत्रु (दुश्मन)यांच्यासोबतही असे घडु नये परंतु संपुर्ण कुटुंबासह आपलाही जीव गमावणे ही बाब आजघडीस ऐकल्यानंतर यावर कोणालाच विश्वास बसेना झालाय. मग प्रश्न असाही उपस्थित होत आहे की, ही केवळ आत्महत्याचीच घटना की घात की अपघात याच्या खोलात जाणे हाच एकमेव पर्याय उरलेला दिसतो आहे. कवानकर कुटुंबातील प्रशांत व मयत झालेल्या थोरला भाऊ प्रविण या दोन भावंडांचा मालमत्तेसाठी वाद सुरू होता आणि या वादाचे काही दिवसांपूर्वी प्रशांत व थोरला भाऊ मयत प्रविण यांच्यामध्ये हाणामारीसुद्धा झाली असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. सोबतच या दाम्पत्याच्या वडिलांनी मृत्यूपुर्वी केलेल्या वाटणीपत्रकात हदगांव शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकान व घर हे धाकटा मुलगा प्रशांत याच्या नावाने केले असल्याची खात्रीलायक माहीती मयत प्रवीण व त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असेही चर्चिले जात आहे. कारण याच जागेत गेली कित्येक वर्षांपासून मयत प्रविण आपली किराणा दुकानदारी चालवत आहे.

संपुर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय आश्चर्य व्यक्त करणारा आहे

कित्येक वर्षांपासून आपल्या सुरू असलेल्या दुकानाची जागा आता आपली राहणार नाही. आपणांस इथुन उठून जावे लागणार या चिंतेने व या विवंचनेतून मयत प्रविण व त्यांचे कुटुंब त्रस्त होते असेही ऐकावयास मिळत आहे. कदाचित हीच बाब प्रविण व त्यांच्या कुटुंबाला असह्य झाली आणि त्याच असह्यतेने आणि झालेल्या अपमानामुळे या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला असावा असेही आता यानिमित्ताने ऐकावयास मिळत आहे. मालमत्तेच्या वादातून खुन, हाणामाऱ्या, आत्महत्या ह्या घटना काही नविन नाहीत परंतु एकाच वेळेला संपुर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा याबाबत कमालीचे आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. मग हा घात किंवा अपघात की मग पाळत ठेऊन केलेला खुनच आहे की काय अशीही चर्चा व तर्कवितर्क यानिमित्ताने व्यक्त केले जात आहेत. मयत प्रविण व त्यांच्या कुटुंबियांना आत्महत्या करण्याकरिता प्रवृत्त करणाऱ्या 'त्या' व्यक्तीस शिक्षा झालीच पाहिजे असा सुर आता समाजबांधवातून उमटत आहे. 'मेले ते गेले' ते आता कधीच परत येऊ शकणार नाहीत हे जरी सत्य असले तरी पण त्या दाम्पत्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या "त्या" व्यक्तीवर आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी समाजबांधवांसह जागरूक नागरीक बांधवांकडून केली जात आहे.

धाकट्या भावाने केलेली मारहाण मयत प्रविण यांच्या जिव्हारी लागली असावी 

आजपर्यंतच्या ऐकीवात असलेल्या घटना पाहता अशा घटना किंवा सामुहिक आत्महत्या करण्याच्या घटना एक तर चारित्र्याच्या संशयावरून घडतात अथवा प्रॉपर्टीच्या वादातून अन्यथा कोणीही आपली व आपल्या कुटुंबियांची जीवनयात्रा अशा पद्धतीने संपवणार नाही हे वास्तव आहे. मयत प्रविण व त्यांच्या कुटुंबीयांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेला शेवटच्या टोकाचा निर्णय हा कदाचित चुकीचाही असेल कारण सामंजस्याने किंवा समाजबांधवांच्या मध्यस्थीने यावर तोडगा किंवा मार्ग काढता आलाही असता परंतु धाकट्या भावाने केलेल्या मारहाणीमुळे झालेला अपमानही बाब मयत प्रविण यांच्या जिव्हारी लागला असावा यातुनच ह्या दाम्पत्याने जीवनाचा शेवट ज्याठिकाणी होतो ते शेवटचे पाऊल उचलण्याचा मजबुरीने निर्णय घेतला असावा अशीही चर्चा या दुर्देवी घटनेनंतर ऐकावयास मिळत आहे. प्रविण आणि त्यांचे कुटुंबास खरोखरच न्याय द्यावयाचा झाल्यास या सामूहिक आत्महत्येमागील गुढ शोधावेच लागेल तर आणि तरच प्रविण व त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्यासारखे होईल. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com