esakal | वाळू चोरांसाठी ग्रामीण मार्गावर खोदला खंदक अन् त्यात पडली गाय!
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वाळू चोरी थांबविण्यासाठी तलाठ्याने अफलातून प्रयत्न फासला

वाळू चोरांसाठी ग्रामीण मार्गावर खोदला खंदक अन् त्यात पडली गाय!

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : आर्थिक हित संबंधातून सोईस्करपणे सुरु असलेली पैनगंगा नदी पात्रातील वाळू चोरी अनियंत्रित झाल्यानंतर त्यावर अंकुश मिळविण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांनी गोकुळ गोंडेगावपासून पैनगंगा नदी पात्रापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पोलिस बंदोबस्तात जेसीबी मशीनने खंदक खोदून व्यापारिक दृष्ट्या महत्त्वाचे तसेच विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा सार्वजनिक रस्ते विकास मंडळ नांदेडच्या रस्ते विकास योजना २००१ ते २०२१ मध्ये समाविष्ट असलेला ग्रामीण मार्गच बंद करुन टाकला आहे. यामुळे बोलक्या माणसांसह मुक्या जनावरांना तलाठी, ग्रामसेकाच्या ‘शेख चिल्ली’धोरणाचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

पैनगंगा नदी पत्रातून गोकुळ गोंडेगाव येथून वाळूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याच्या वावळ्या उठल्यानंतर वाळू चोरांना क्लीनचीट देत मुळ रस्ताच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ( ता. १०)  रोजी तलाठी व ग्रामसेवकाने पोलिस बंदोबस्तात राणीधानोरा, पैनगंगा नदी ते गोकुळ गोंडेगावला येणाऱ्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर बंडू राकेश यांच्या शेताजवळ जेसीबीच्या साह्याने मोठे खंदक खोदून शिवाय दगड टाकून हा रस्ता कायमचाच बंद करुन टाकला आहे. हा रस्ता बंद करतांना तलाठी व ग्रामसेवकाने कमालीचा उत्साह दाखविला. परंतु सदर रस्ता हा सार्वजनिक रस्ते विकास मंडळ नांदेडच्या रस्ते विकास योजना २००१ ते २०२१ मध्ये क्रमांक १०३ वर समाविष्ट असलेला ग्रामीण मार्ग आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वात कमी अंतराचा रस्ता आहे. गोकुळ गोंडेगाव, सायफळ व मदनापुर शिवारातील जनावरांना पाणवठ्याच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे. (ता. ११) रोजी नदीवर पाण्यासाठी जात असलेली गाय या खड्ड्यात पडल्याची घटना देखील घडली आहे. 

पशुपालक शेतकरी यांचा वर्षानुवर्षाचा रहदारीचा मार्ग बंद

सुतारवाडी (बे.), गोकुळ शिवारातील शेतकऱ्यांना बैलगाडीसह याच रस्त्यावरुन जावे लागते. त्यापेक्षाही महत्वाचे गोकुळ गोंडेगाव व लगतच्या खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांसाठी आर्णी कृषी बाजार पेठ व यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, आर्णी, लोणबेहेळ, इचोरा सेलू, सेंदूरसणी, अंजनखेड व शारी इत्यादी गावातील पशुपालक व पशुविक्रेते यांना वाई बाजारचे बैल बाजारला याच मार्गाने वाटचाल करावी लागते. प्रशासनाने कोणत्याही बाबीचा विचार न करता शासन दरबारी नोंद असलेल्या रस्त्यावर खंदक खोदून, दगडाच्या भिंती उभे करुन पशुपालक शेतकरी यांचा वर्षानुवर्षाचा रहदारीचा मार्ग बंद करून टाकला आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी हा पर्याय असू शकत नाही. वाळू चोरांसोबतचे आर्थिक हितसंबंध या घटनेला कारणीभूत असल्याची तक्रार गोकुळ गोंडेगाव येथील शेतकरी, पशुपालक करत आहेत.

शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे

गोकुळ गोंडेगाव ते पैनगंगा नदी राणी धानोरा ग्रामीण मार्ग शंभर ते दीडशे शेतकऱ्यांच्या हितासाठी खडीकरण करुन मजबुतीकरण करणे गरजेचे असल्याने आमदार भीमराव केराम यांच्याकडे निधी मागण्यात आला आहे. तलाठी, ग्रामसेवक वाळू चोरी रोखण्यासाठी खंदक खोदण्यापूर्वी त्यांना बैलगाडी व जनावर जाण्यासाठी रस्ता सोडून खोदकाम करण्याच्या सूचना केल्या होता. परंतु तलाठी, ग्रामसेवक यांनी माझ्या सूचनेचे पालन केले नाही.व आवश्यक रस्ता खोदून टाकला. यामुळे शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे.

- मंगल भारत हातमोडे,, सरपंच, गोकुळ गोंडेगाव.

वाई येथील प्रसिद्ध बैलबाजार साठी दिग्रस, आर्णीवरून बैलाच्या दावणी याच मार्गाने येतात शिवाय जनावरांना नदीवर पाण्यासाठी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग बंद करण्यात आल्याने जनावर, माणसं आमच्या शेतातून रस्ता पाडत आहेत. प्रशासनाने तो रस्ता पूर्ववत सुरु केला नाही. तर आमच्या शेतात ही बांध खोदून रस्ते बंद करणार आहोत.

बंडू उकंडराव राकेश, शेतकरी,गोकुळ गोंडेगाव.

संपादन- प्रल्हाद कांबळे