
इतवारा पोलिसांनी पाठलाग करुन अटक केल्यानंतर त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस जप्त केले आहे.
नांदेड : शहर व जिल्ह्यात पिस्तुल, तलवार, खंजर, असे घातक शस्त्र सोबत बाळगणारी गुन्हेगारी प्रवृत्तीची तरुणाई आपल्या हातातील शस्त्राच्या धाकावर अनेकांना लुबाडत आहेत. नांदेडसारख्या शहरात हा प्रकार गंभीर असून पोलिसांना एक प्रकारे आव्हान देत आहेत. अशाच एका युवकास इतवारा पोलिसांनी पाठलाग करुन अटक केल्यानंतर त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस जप्त केले आहे. त्याच्याविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. चार) पहाटे चारच्या सुमारास मालटेकडी रेल्वेउड्डाण पुलाजवळ केली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की इतवारा पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे हे आपले सहकारी हवालदार विक्रम वाकडे, शेख सत्तार आणि हबीब चाऊस यांना सोबत घेऊन पोलिस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पहाटे चारच्या सुमारास इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मालटेकडी ब्रिज परिसरात अमजद खान अनवरखान (वय 27) ट्रक चालक रा. इकबालनगर, गाडेगावरोड, नांदेड हा संशयास्पदरित्या फिरत होता.
पोलिसांना माहिती मिळताच पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा ( पिस्तूल ) ज्यात मॅक्झिन व मॅक्झिनमध्ये दोन जिवंत काडतुस असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. फौजदार दत्तात्रय काळे यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा प्रतिबंध अन्वये ट्रक चालक अमजदखान अनवरखानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नांगरे करीत आहेत.
यापूर्वीही ईतवारा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त केल्याची कारवाई झाली होती. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या सूचनेवरुन फौजदार दत्तात्रय काळे यांच्या पथकाने केली.