नांदेड शहरामध्ये ऐकू आले भूगर्भातून दोन आवाज

अभय कुळकजाईकर
Monday, 9 November 2020

नांदेड शहरातील यशवंतनगर, गणेशनगर, राजनगर, लेबर कॉलनी, जनता कॉलनी, आंबेडकरनगर, श्रीनगर, विवेकनगर, स्नेहनगर, आयटीआय, व्हीआयपी रस्ता आदी भागात सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान भूगर्भातून दोन आवाज ऐकू आले.

नांदेड - नांदेड शहरातील काही भागात सोमवारी (ता. नऊ) सकाळी दोन वेळा भूगर्भातून आवाज आले. त्यामुळे काही काळासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी नागरिक घराबाहेर आले होते. मागील महिन्यातही ता. २५ आॅक्टोंबर रोजी अशा पद्धतीने आवाज दोन आवाज भूगर्भातून आले होते.

नांदेड शहरातील यशवंतनगर, गणेशनगर, राजनगर, लेबर कॉलनी, जनता कॉलनी, आंबेडकरनगर, श्रीनगर, विवेकनगर, स्नेहनगर, आयटीआय, व्हीआयपी रस्ता आदी भागात सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान भूगर्भातून दोन आवाज ऐकू आले. त्यामुळे काही ठिकाणी नागरिक बाहेर रस्त्यावर आले होते. भूगर्भातील आवाज हे भूकंपाचे धक्के असल्याचे कळाल्यानंतर नागरिकांमध्ये काहीशे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

हेही वाचा - कोरोनात आशांची लढाई, आतातरी फलद्रुप प्रत्यक्षात येणार का? 

दोन आवाजाची नोंद
नांदेड शहरात सोमवारी सकाळी दोन वेळा भूगर्भातून आलेल्या आवाजाची नोंद नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात असलेल्या भुकंपमापन केंद्रावर झाली आहे. त्यात आठ वाजून ५० मिनिटे आणि आठ वाजून ५४ मिनिटाला अनुक्रमे ०.८ आणि ०.९ रिश्टर स्केल नोंद झाली असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी दिली आहे. 

यापूर्वी देखील आले होते आवाज
यापूर्वी देखील नांदेड शहरातील काही भागात २००८ च्या दरम्यान आवाज ऐकू येत होते. २०११ मध्ये देखील आवाज ऐकू आले होते. त्या आधीही भूगर्भातून आवाज ऐकू येत होते. शहरातील सायन्स आणि पिपल्स महाविद्यालय परिसर, विवेकनगर, श्रीनगर, स्नेहनगर, वर्कशॉप, पाटणूरकर नगर, भाग्यनगर आदी भागात त्यावेळी भूगर्भातून आवाज ऐकू आले होते. त्यावेळी देखील अनेकजण घाबरून गेले होते. काही जणांनी घरासमोर झोपडीवजा राहण्याची व्यवस्था केली होती. अनेक दिवस काहींनी बाहेरच मुक्काम केला होता. काही जणांनी जागाही सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले होते. जिल्हा आणि महापालिका प्रशासनातर्फे त्या काळात जनजागृती मोहिमही राबविण्यात आली होती. 

हेही वाचलेच पाहिजे - परभणीचा पारा 8.8 अंश सेल्सिअसवर, शेकोट्या पेटल्या

भूकंपमापन यंत्रावर नोंद
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भूशास्त्र विभागात भूकंपमापन यंत्र बसविण्यात आले आहे. त्या ठिकाणी नोंद होत असते. सोमवारी झालेल्या अतिसौम्य भुकंपाची नोंद झाली आहे. विद्यापीठातील भूभौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख टी. विजयकुमार यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर या संदर्भातील सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागात दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी नांदेड शहरात मार्च २०११ मध्ये एकाच दिवशी किरकोळ स्वरुपाचे १२५ धक्के जाणवले असल्याची माहितीही प्रा. टी. विजयकुमार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two sounds were heard in the city of Nanded, Nanded news