esakal | उमरीचा सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; पेट्रोलचा खर्च मागणे पडले महागात
sakal

बोलून बातमी शोधा

लाचेचा सापळा

उमरीचा सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; पेट्रोलचा खर्च मागणे पडले महागात

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : तक्रारदार यांच्या पुतणीच्या पतीविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीत कार्यवाही करण्यासाठी पेट्रोल खर्च म्हणून दीड हजार रुपये लाच घेणारा उमरी पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार संभा कदम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Acb trapp in umri police station) सापळ्यात मंगळवारी (ता. १८) दुपारी अडकला. त्याच्याविरुद्ध उमरी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Umar's assistant magistrate in the ACB's net; The cost of petrol has gone up)

याबाबत अधिक माहिती अशी की, उमरी तालुक्यातील एक तक्रारदाराची चुलत पुतणी हिने तिच्या पतीविरुद्ध मारहाण व मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याची तक्रार उमरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु त्या तक्रारीची काही दखल पोलिसांकडून घेतल्या जात नव्हती. अखेर तक्रारदार हा पोलिस ठाण्यात गेल्यानंतर सहाय्यक फौजदार संभा कदम याने यात कारवाई करण्यासाठी पेट्रोल खर्च म्हणून तुम्हाला दीड हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली.

हेही वाचा - मोकाट फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी; जिंतूर पोलिस व नगरपालिकेची कारवाई

लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ता. १४ मे रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ता. १५ मे रोजी पडताळणी सापळा लावण्यात आला. पैसे मागणी सिद्ध झाल्याने मंगळवार (ता. १८) दुपारी उमरी पोलिस ठाणे परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि यात सहाय्यक फौजदार संभा बळीराम कदम (वय ५५) राहणार सांगवी, नांदेड याला रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, अंमलदार हनुमंत बोरकर, किसन चिंचोरे, अमरजीतसिंह चौधरी, मारुती सोनटक्के आणि शेख मुजीब यांनी परिश्रम घेतले.