वंचितचे खड्ड्यात फूल टाकून आणि चिखलात लोळून अनोखे आंदोलन

बा. पू. गायखर 
Saturday, 19 September 2020

वंचित बहुजन आघाडीने लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डेमय रस्त्यासाठी ‘ फुल बरसावो आंदोलन ’ पुकारले. शुक्रवारी (ता. १८) कार्यकर्ते रस्त्यावर आले. ‘ बहारो फुल बरसावो’ या हिंदी गाण्याचे विडंबन करत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या विरोधात. ‘ आमदार चुनके आया है !’ अशी टीका गाण्यातून करण्यात आली

लोहा (जि. नांदेड ) : विधानसभा निवडणुकीनंतर लोहा- कंधारच्या इतिहासात पहिल्यांदाच असे हे आगळे वेगळे  आंदोलन करण्यात आले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्याकडून होणारी हेळसांड आणि मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, रस्त्याची प्रचंड दुरावस्था याविषयी गेल्या दोन वर्षात जनसामान्यात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीने लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डेमय रस्त्यासाठी ‘ फुल बरसावो आंदोलन ’ पुकारले. शुक्रवारी (ता. १८) कार्यकर्ते रस्त्यावर आले. ‘ बहारो फुल बरसावो’ या हिंदी गाण्याचे विडंबन करत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या विरोधात. ‘ आमदार चुनके आया है !’ अशी टीका गाण्यातून करण्यात आली व खड्ड्यातील पाण्याने शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यास आंघोळ घालण्यात आली. वंचितचे अनोखे आंदोलन शहर व तालुक्यात लक्षवेधी ठरले.

लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे झाले. एका महिन्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे आमदार शिंदे व नगराध्यक्ष यांच्यात चढाओढ लागली होती. पूर्वी धूळ आता चिखलराडीतून वाहनांना हाकता येत नाही. या पूर्वीच्या  वकिल महासंघ, कॉंग्रेस पक्षानेही यावर आंदोलन केले होते. खड्ड्यांमुळे वाहनधारक, पादचाऱ्यांचा जीव  मेटाकुटीला आला आहे. अनेक अपघात होत आहेत. या अपघातात अनेक लोक जखमी झाले आहेत.
या रस्त्यावरील खड्ड्यात फुल बरसावो आंदोलन वंचितचे जिल्हाअध्यक्ष शिवा नरंगले यांनी आंदोलन केले.

हेही वाचा -  Video- गोदावरीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे उघडले सहा दरवाजे

कार्यकर्त्यांचे चिखलात लोळून आंदोलन 

"आमदार चुनके आया है!...की नोट दिया है! " असे विडंबन गीत वाजत- गाजत शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यात फुले टाकत कार्यकर्त्यांची रॅली निघाली. नरबा पाटील कॉम्प्लेक्स समोरील खड्ड्यात फुले टाकण्यात आली. दोन पुतळे या पाण्यात बुडवण्यात येत असताना पोलिसांनी एक पुतळा ताब्यात घेतला दुसऱ्या पुतळ्यास मात्र  खड्ड्यातील पाण्याने अंघोळ घालण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी चिखलात लोळून आंदोलन केले.

या कार्यकर्त्यांची होती उपस्थिती

यावेळी वंचितचे श्याम कांबळे, सतीश आनेराव, संतोष पाटील, सदानंद धुतमल, शिवराज मुंडकर, सुशिल ढवळे, छगन हटकर, बाळू भोळे, शरद कापुरे, हमीद लदाफ, सुर्यकांत तिगोटे यांच्यासह आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील मध्यभागी असलेला हा मुख्य रस्ता अतिक्रमणयुक्त

लोहा शहरातील मध्यभागी असलेला हा मुख्य रस्ता अतिक्रमणयुक्त आहे. रस्त्याच्या दुतर्फा सांडपाण्याचे गटार होणे आवश्यक आहे. जोपर्यंत अंतर्गटार होत नाही, रस्त्यावरील अतिक्रमण हटत नाही आणि सिमेंटचा मजबूत रस्ता होत नाही तोपर्यंत या रस्त्याची अशीच दुरावस्था राहील. या भागातील खासदार, आमदार आणि बांधकाम विभाग, नगरपालिका विभाग यांच्या समन्वयातून हा तोडगा निघाला तरच लोहा शहराचे भवितव्य चांगले असेल." 
- प्रा. मनोहर धोंडे, अध्यक्ष, शिवा संघटना. 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique movement of the deprived by throwing flowers in the pit and rolling in the mud nanded news