Video - गोदावरीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे उघडले सहा दरवाजे

अभय कुळकजाईकर
Friday, 18 September 2020

नांदेडला गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात वरील भागातून पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे सहा दरवाजे शुक्रवारी (ता. १८ सष्टेंबर) उघडण्यात आले आहेत. या सहा दरवाजातून ८५ हजार क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरुन वाहत असून नदीकाठच्या गावांना खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नांदेड - गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने पाण्याचा येवा वाढत आहे. यामुळे नांदेड पाटबंधारे विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणुन शुक्रवारी (ता. १८) प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून ८४ हजार ५४१ क्युसेक्स वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. आतापर्यंत सर्वाधीक पाणी गोदावरीत सोडण्यात येत असल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे.

नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात पाणी येत आहे. मागील काही दिवसापासून सतत दरवाजे उघडे करुन नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

हेही वाचा - विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना धीर द्यावा ः मंत्री उदय सामंत 

गोदावरीची पाण्याची पातळी वाढली
मराठवाड्यातील जवळपास सर्वच प्रकल्प भरल्यामुळे त्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, जायकवाडी प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे या प्रकल्पाचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे जायकवाडीच्या खाली असलेल्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन शुक्रवारी (ता. १८) विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून गोदावरी नदीत ८४ हजार ५४१ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याचे माहिती पूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली. 

दिवसभरात उघडले सहा दरवाजे
विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा गुरुवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता उघडून १२ हजार ९२४ क्युसेक्स पाणी गोदावरीत सोडण्यात आले. तर शुक्रवारी (ता. १८) पहाटे साडेपाच वाजता दोन गेट उघडून ३३ हजार ३६५ क्सुसेक्स पाणी सोडण्यात आले. यानंतर सकाळ आठ वाजता पुन्हा चौथा दरवाजा उघडून ६३ हजार २८२ क्युसेक्स वेग करण्यात आला. यानंतर साडेनऊ वाजता पाचवा दरवाजा उघडून ७५ हजार ४२ क्युसेक्स वेग करण्यात आला. यानंतर सकाळी साडेअकरा वाजता सहावा दरवाजा उघडून ८४ हजार ५४१ क्युसेक्स वेगाने पाणी गोदावरीत सोडण्यात येत आहे.   

हेही वाचलेच पाहिजे - प्रमोद शेवाळे नांदेडचे नवे पोलीस अधीक्षक, विजयकुमार मगर यांची बदली 

प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा 
सद्यस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाच दरवाजातून ८५ हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टी झाली तर सध्या नांदेड शहरातील गोदावरी नदीचे पाणी धोक्याची पातळी गाठू शकते. सध्या जुन्या पुलावर ३४४ मीटर पाणी पातळी असून इशारा पातळी ३५१ मीटर आहे तर धोका पातळी ३५४ मीटर इतकी आहे. सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपर्यंत असाच पाऊस चालू राहिला तर पातळी वाढू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Six doors of Vishnupuri project opened on Godavari, Nanded news