नांदेडला कौठ्यात उभारणार अद्ययावत जिल्हा क्रीडा संकुल

प्रा. इम्तियाज खान
Monday, 5 October 2020

सोमवारी (ता. पाच) नियोजन भवनात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत सादर केलेल्या या प्रस्तावास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यता दिली आहे. कौठा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस आयोजित केला होता. त्या जागेत २५ ते ३० एकर जमिनीवर भव्य बहूउद्धेशीय जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी मान्यता मिळाली आहे. 

नांदेड - श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियमसारखे आणखी एक अद्ययावत बहुउद्देशीय क्रीडा संकुल शहरात व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनातर्फे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. या मागणीनुसार कौठा येथे अद्ययावत बहुउद्देशीय जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याच्या निर्णयास सोमवारी (ता. पाच) जिल्हा विकास कार्य आढावा बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली.

गेल्या २००८ पासून श्री गोविंदसिंघजी स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटचे स्टेडियम करण्यासाठी प्रशासनाने काम सुरु केले होते. ते आता पूर्णत्वाला पोहचत आहे. मात्र, यामुळे क्रिकेट खेळा व्यतिरिक्त इतर खेळांच्या सराव व स्पर्धेसाठी सार्वजनिक मैदान उपलब्ध नसल्यामुळे शासकीय आंतरशालेय व इतर खेळांच्या सराव व स्पर्धेसाठी बाल व युवा खेळाडूसाठी हक्काचे मैदान उपलब्ध नव्हते. जवळपास मागील बारा वर्षापासून ही अडचण क्रीडा क्षेत्राची होती. नुकतेच शासनाने जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या रचनेत फेरबदल करून जिल्हाधिकारी ऐवजी पालकमंत्री यांना या समितीच्या अध्यक्षपदाचे अधिकार दिले. यामुळे जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन पालकमंत्री श्री. चव्हाण यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी आपली अडचण सांगून जिल्हा क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले होते. 

हेही वाचा - ‘विष्णुपुरी’तून आतापर्यंत तीन हजार चारशे दलघमी विसर्ग

जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही या प्रस्तावासाठी सकारात्मक भूमिका घेतली व क्रीडा आयुक्तालयातर्फे निधीसाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान, त्यांनी सर्व जिल्हा क्रीडा संघटनांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोमवारी (ता. पाच) नियोजन भवनात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत सादर केलेल्या या प्रस्तावास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यता दिली आहे. कौठा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस आयोजित केला होता. त्या जागेत २५ ते ३० एकर जमिनीवर भव्य बहूउद्धेशीय जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी मान्यता मिळाली आहे. 

पालकमंत्र्यांनी दिली मान्यता
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी या प्रस्तावास प्रतिसाद दिला व लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल असे सांगत पालकमंत्री यांनी देखील मान्यता दिली आहे. या क्रीडा संकुलात एकाच छताखाली सर्व खेळाच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणारा असा भव्य व मराठवाड्यातील एकमेव क्रीडा संकुल राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्यासह संबंधित इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचलेच पाहिजे - अधिक मास कोरोनाच्या सावटात, जावयांची मेजवानी हुकली : भेटवस्तूंही नाही 
 

अद्ययावत क्लब हाऊसही होणार
कौठा येथे २५ एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येईल. या स्टेडियममध्ये क्रिकेट व्यतिरिक्त इतर सर्व खेळाच्या सुविधा राहणार आहेत. क्रीडा व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबी या स्टेडीयमवर अजिबात होणार नाहीत. तसेच गरवारे स्टेडीयमच्या धर्तीवर एक अद्ययावत व सुविधापूर्ण असे क्लब हाऊस देखील या क्रीडा संकुलामध्ये उभारले जाईल.
- अशोक चव्हाण, पालकमंत्री.

(संपादन - अभय कुळकजाईकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An updated district sports complex will be set up in Nanded, Nanded news