esakal | नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनेक नावांची चर्चा होती. त्यामध्ये वर्षा ठाकूर आणि शिवानंद टाकसाळे यांच्या नावची चर्चा आघाडीवर होती.

नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर 

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर औरंगाबाद येथील सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांची निवड झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी (ता.२४) काढले आहेत.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची बदली १७ मार्च रोजी झाली आहे. तेव्हापासून हे पद रिक्तच होते. दरम्यान प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई होवू नये यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता. श्री. काकडे यांच्या बदलीनंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनेक नावांची चर्चा होती. त्यामध्ये वर्षा ठाकूर आणि शिवानंद टाकसाळे यांच्या नावची चर्चा आघाडीवर होती.  

हेही वाचा - नांदेड - सर्वाधिक प्रवासी कर भरणाऱ्या ‘एसटी’ची झोळी रिकामीच

अखेर गुरुवारी सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या निवडीचे आदेश दुपारी धडकले. वर्षा ठाकूर यांना नुकतीच भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने नियुक्ती मिळाली आहे. या नियुक्तीनंतर त्यांची पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महिलाच आहे. उपाध्यक्ष देखील महिलाच असून आता सीईओ म्हणूनही महिलाच असणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील महिला राज आता प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे.

हे देखील वाचाच - नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याची का होतेय मागणी?

दांडगा लोकसंपर्क असलेल्या अधिकारी
सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण, कन्नड येथे काम केलेले आहे. दरम्यान त्यांनी तक्रारदारांना थेट भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देत.  तसेच विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी पुरवठा विभागाचे उपायुक्त पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सध्या त्या सामान्य प्रशासन विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी काही काळ म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून काम बघितले आहे. त्यांचा हा दांडगा अनुभव निश्‍चितच नांदेड जिल्हा परिषदेला उपयोगी पडणार आहे.