विक्की चव्हाण खून प्रकरण : कैलास बिगानियासह दोघांना पोलिस कोठडी 

प्रल्हाद कांबळे
Friday, 23 October 2020

कैलास बिगानिया व दिलीप डाखोरे यांना विमानतळ पोलिसांनी न्यायालयासमोर शुक्रवारी (ता. २३) हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश (चौथे) यांनी ता. २८ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी सांगितली.

नांदेड : नांदेड शहर व परिसरात प्रचंड दहशत पसरवून पोलिसांची डोकेदुखी वाढविणाऱ्या कुख्यात विक्की चव्हाणचा खून कैलास बिगानीयाच्या टोळीने अत्यंत निर्दयपणे केला होता. त्यानंतर तो फरार होता. यातील जवळपास नऊ आरोपी अटक केली होती. मात्र कैलास बिगानीया हा अन्य काही साथिदारांसह फरार होता. या आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करत अखेर त्यांना बुधवारी (ता. २१) रात्री अटक केली होती. कैलास बिगानिया व दिलीप डाखोरे यांना विमानतळ पोलिसांनी न्यायालयासमोर शुक्रवारी (ता. २३) हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधीश (चौथे) यांनी ता. २८ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी सांगितली.

विक्की चव्हाण आणि कैलास बिगानीया यांच्यात टोळीयुध्द होते. या दोघांनीही अल्पवयीन युवकाना आपल्या टोळीत सहभागी करुन घेतले होते. या दोघांचे नेहमी खटके उडत असत. वर्चस्वाच्या वादातून विक्की चव्हाण याचा खून करण्याचे कट कारस्थान कैलास बिगानीया याने रचला. या घटनेच्या काही दिवस अगोदर विक्की चव्हाण याने कैलास बिगानियाच्या एका नातेवाईकसोबत वाद घातला होता. याचा राग मनात धरुन बिगानिया याने आपल्या काही साथिदारांना सोबत घेऊन विक्कीचा पाठलाग केला. 

हेही वाचा -  अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना लाभदायक -

सिनेस्‍टाईल पाठलाग करुन केले होते जेरबंद

ता. चार आॅगस्टच्या रात्री नऊच्या सुमारास विक्की चव्हाण हा विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव रस्त्यावर असल्याची माहिती बिगानिया याला मिळाली. त्याने त्या ठिकाणी जावून सर्वप्रथम विक्की चव्हाणच्या गाडीला आपल्या कारचा धक्का दिला व खाली पाडले. एवढेच नाही तर त्याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून त्याला जायबंद केले. त्यानंतर त्याचा मृतदेह आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करुन पुरावा नष्ट करण्यासाठी पळवून नेला. मात्र पोलिसांना शहर व परसिरात नाकाबंदी केल्याने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. मात्र हस्सापूर शिवारात नेऊन गोदावरी नदीच्या परिसरात एका झुडपात त्याचा मृतदेह टाकून पसार झाले होते. हा मृतदेह ता. पाच आॅगस्ट रोजी सकाळी सापडला होता.

स्थानिक गुन्हे शाखेची धाडशी कारवाई

ता. चार ऑगस्ट रोजी विकी चव्हाणचा खून करून आपली दहशत पसरवण्याचा कैलासला यश आले. मात्र त्याच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल झाला. यानंतर तो पसार झाला. त्याच्या काही साथीदारांना विमानतळ, नांदेड ग्रामिण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अटक केली. ते सध्या कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. कैलास व त्याचे इतर दोन साथिदार हे फरार असल्याने व तो अट्टल गुन्हेगार असल्याने पोलिसांना चकमा देत होता. पोलिस मात्र त्याच्या मागावरच होते. अखेर त्याचा खेळ खल्लास झाला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. या गुन्ह्यात यांच्यासह आतापर्यंत १२ जणांना अटक केली. 

येथे क्लिक करालोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई : सचखंड एक्सप्रेसमधून 29 लाखाचा गुटखा जप्त -

पाच दिवसाची पोलिस कोठडी

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्वत: आपले सहकारी फौजदार आशिष बोराटे, कर्मचारी हनुमंत पोद्दार, संजय केंद्रे, बजरंग बोडके, रवी बाबर, पद्मसिंह कांबळे, बालाजी तेलंग, गंगाधर कदम, विठ्ठल शेळके, बालाजी यादगीरवाड आणि चालक दादाराव श्रीरामे यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीवरुन पक्कीचाळ परिसरातून कैलास बिगानिया व त्याच्या एका साथिदाराला अटक केली होती. या दोघांनाही विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vicky Chavan murder case: Kailas Bigania and two others in police custody nanded news