Video - नांदेडमध्ये आनंदवन घनवन वृक्षलागवडीला सुरवात 

अभय कुळकजाईकर
शुक्रवार, 10 जुलै 2020

नांदेडला महापालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे शुक्रवारी नाना-नानी पार्क येथे महापौर दीक्षा धबाले, जिल्हाधिकारी डॉ. विपिन, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदवन घनवन (मियावाकी वृक्षलागवड) पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली. 

नांदेड - वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नांदेड महापालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या वतीने शुक्रवारी (ता. दहा) नाना-नानी पार्क येथे महापौर दीक्षा धबाले, जिल्हाधिकारी डॉ. विपिन, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदवन घनवन (मियावाकी वृक्षलागवड पद्धती) पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली.

नांदेड महापालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील नाना-नानी पार्क येथून प्रथम या मोहिमेला सुरवात करण्यात आली. यावेळी शंभर स्क्वेअर मीटरमध्ये तीनशे वृक्षांची लागवड करण्यात आली. शहरातील पहिल्या प्रकल्पाचा प्रारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षलागवड करून करण्यात आला. 

हेही वाचा - धो-धो वाहणारा सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांच्या प्रतिक्षेत 

लोकसहभाग वाढविण्याची गरज
जिल्हाधिकारी डॉ. विपिन म्हणाले की, अशा प्रकल्पांमध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे. महापौर धबाले यांनी नागरिकांनी यामध्ये सहभाग वाढवावा, असे आवाहन केले. याच धर्तीवर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा बेग आणि फाउंडेशनचे अध्यक्ष मुगटकर यांनी दिली. महापालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मनपाच्या मलशुध्दीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, शाळा, दवाखाने व जिथे जागा उपलब्ध असेल अशा जवळपास वीस ठिकाणी असे प्रकल्प राबविण्याचा मानस आहे.

महापालिका व वृक्षमित्र फाऊंडेशनचा पुढाकार
महापालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी शहर परिसरात ‘हरित नांदेड अभियान’ राबविले जात आहे. या अंतर्गत शहर परिसरात नागरी वसाहतीत, मुख्य रस्ते, मोकळ्या जागा, शाळा महाविद्यालय परिसरात लोकसहभागातून वृक्ष भेट देवून वृक्षलागवड मोहिम राबविली जात आहे. शहरात सिमेंटची जंगले निर्माण झाली आहेत नागरी भागात जर छोट्या वनांची निर्मिती झाली तर ते शहरांसाठी फुफ्फुस म्हणून काम करू शकेल शहरी भागात नागरी वनांची वाढ करण्याच्या उद्देशाने केंद्रिय वन मंत्रालयाने तसेच महाराष्ट्र शासनाने पावले उचलली आहेत. राज्यात वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान राबविले जात असून या अंतर्गत राज्याचे वनक्षेत्र वाढले पाहिजे यासाठी आनंदवन घनवन (मियावाकी वृक्ष लागवड पध्दती) छोट्या वनांचे निर्माण केले जात आहे.

काय आहे प्रकल्प
या प्रकल्पामध्ये जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.अकिरा मियावाकी यांची तर्कशुध्द व दाट लागवडीची संकल्पना अंमलात आणली आहे. या वृक्षलागवड पध्दतीमध्ये स्थानिक व दुर्मिळ प्रजातींचा वापर करण्यात आला असून वृक्षलागवड एका स्तरात न करता चार स्तरांमध्ये झुडुप, उपवृक्ष, वृक्ष व कॅनोपी अशा वर्गीकरणात करण्यात आली. वृक्षलागवडीचे क्षेत्र दहा मीटर बाय दहा मीटर असे शंभर चौरस मीटर घेण्यात येवून एक मीटरमध्ये तीन झाडे या प्रमाणे तीनशे वृक्षांची लागवड करण्यात आली. सर्वप्रथम शंभर चौरस मीटरमध्ये खोदकाम करून मातीमध्ये जैवभार टाकला जातो. ज्यामध्ये शेणखत, तांदुळाचा कोंडा, लाकडी भूसा, कोकोपीट, हिरवे आच्छादन साहित्य असे वृक्षांसाठी पोषणमूल्य घटकांचा वापर करण्यात आला आहे. आज वृक्षारोपण करण्याआधी सेंद्रिय जीवामृत वापरण्यात आले. झाडांची लागवड करताना नागमोडी पध्दतीने एका मीटरमध्ये तीन झाडे ही पध्दत वापरण्यात येवून रोपांना बांबूच्या काठीचा आधार दिला जातो.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात ३० मिली मिटर पावसाची नोंद

आनंदवन घनवन पध्दतीचे काय आहेत फायदे
अशा घनवन पध्दतीचे खुप मोठे फायदे आहेत. यामध्ये छोट्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होते. परस्पर स्पर्धेमुळे झाडे जोमाने वाढतात. विविध झाडांची मुळे आपआपसात गुंतून सशक्त मुळसंख्या तयार होते. छोट्या जागेतून प्रचंड प्रमाणात ऑक्सीजन तयार होतो. प्राणी, पक्षी, फुलपाखरे असंख्य जीवजंतू यांना हक्काचा अधिवास प्राप्त होतो. झाडे स्वतःची सेंदिय खाद्ये स्वतः तयार करतात. वायू व ध्वनी प्रदूषणांपासून संरक्षण होते. जमिनीची धूप थांबते. पाण्याच्या पातळीत वाढ होते. तापमान कमी होण्यास मदत होते. परागीभवनास मदत होते. जैवविविधता राखली जाते. या पध्दतीद्वारे लवकर छोटी जंगले तयार होतात. झाडे जगण्याची शक्यता ९० टक्के असते. झाडे संगोपनाचा कालावधी कमी असतो.

नाना - नानी पार्कमध्ये तीनशे वृक्षांचे वृक्षारोपण    
नांदेड शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नाना नानी पार्क येथे पहिला वृक्षमित्र आनंदवन घनवन प्रकल्पात शुक्रवारी तीनशे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त शुभम क्यातमवार, वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, विभागीय वन अधिकारी वाय. शेख, महापालिकेचे उद्यान अधीक्षक डॉ. फरतुल्ला मिर्झा बेग, कैलास अमिलकंठवार, नगरसेवक नागेश गड्डम, विजय येवनकर, सचिन जोड, नानाजी रामटेके, लक्ष्मण गज्जेवार, गणेश साखरे, घोरबांड गुरुजी, अतुल डोंगरगावकर, विजय चित्तरवाड, ज्ञानेश्‍वर गोरे, डॉ. परमेश्‍वर पौळ, महाबळे, बबलू मगरे, संध्या मुगटकर, सावळे, शिवप्रसाद मठवाले, संजय बोडके, सतीश कुलकर्णी, अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Anandvan Ghanvan tree planting begins in Nanded, Nanded news