Video : दुसऱ्यादिवशी प्रवाशी संख्येत दुपटीने वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

जिल्ह्यांतर्गत वाहतूक नियमावलीत शुक्रवार (ता.२२) पासून काहीसे बदल केले आहेत. मागील ६० दिवसांपासून बंद असलेली एसटी महामंडळाची बस सुरु झाल्याने दोन महिण्यापासून घरातच लॉकडाउन असलेल्या एक हजार ११९ नागरिकांनी शुक्रवारी महामंडळाच्या लालपरीने तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास केला.

नांदेड : शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु, पहिल्या दिवशी महामंडळाच्या बसला म्हणावा तसा प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२३) प्रवाशी संख्या दुपटीने वाढल्याचे दिसून आले.

बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी त्या बसेसचे निर्जुंतुकीकरण करण्यात येत असून, चालक आणि वाहक यांना सॅनिटायझर, तोंडाला बांधण्यासाठी मास्क आणि सुरक्षा किट देत बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. बसमध्ये समांतर अंतर ठेवत एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशी याप्रमाणे बसमध्ये प्रवाशांना जागे देण्यात येत आहे. एखादा प्रवाशीमध्ये उतरल्यास पुढील प्रवासात रिकाम्या सिटवर प्रवाशी घेण्याची मुभा दिली जात आहे.

सध्यातरी महामंडळाच्या बसद्वारे जिल्ह्यांतर्गत सेवा देणे सुरु असले तरी, बाजुचा जिल्हा रेडझोन नसेल तर त्या जिल्ह्यापर्यंत बसेस सोडण्याचा शासनाचा विचार असल्याचे एका वरिष्ठ अधिकारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना माहिती दिली. त्यामुळे सध्या सुरु असलेली जिल्ह्यांतर्गत बससेस या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात प्रवेश केला तर नवल वाटणार नाही.

हेही वाचा- नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा.... कसा तो वाचा

अगोदरच तोट्यात असलेले एसटी महामंडळ लॉकडाउनमुळे पुरते डबघाईस आले आहे. त्यामुळे रोज कोट्यवधींचा फटका बसत आहे. महामंडळाच्या लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी ना ना प्रयत्न करत आहेत. एसटीला उत्पन्न मिळवण्यासाठी चालक वाहक प्रवाशांना सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. परंतु, प्रशासनाकडून त्यांना अधिकृत पत्र मिळत नसल्याने पर राज्यातील प्रवाशी एसटी महामंडळाच्या बस स्थानकात विचारपूस करण्यासाठी रांगा लावत आहेत. परंतु, स्थानकात चौकशी कक्षावर विचारणा केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशेचे ढग गडद होताना दिसून येतात.

दुसऱ्या दिवशीचे जिल्ह्यांतर्गत नियोजन
------------------
आगाराचे नाव - गाडी संख्या, फेऱ्या, प्रवाशी संख्या
----
- नांदेड   बस  आगार - १५, ६२, ८७०
- भोकर - सहा, १८, ८७
- किनवट - चार, १४, १३६
- मुखेड - १४, ७१, ७४७
- देगलूर - नऊ, ३०, ३००
- कंधार - १०, ३०, १८७
- हदगाव - पाच, ३४, २६४
- बिलोली - नऊ, ४२, १८३
- माहूर - तीन, १२, १८३
एकुण गाड्या - ७५, ३१२ फेऱ्या पूर्ण, तीन हजार ४३ प्रवाशी

भरघोस प्रवासी मिळतील
शुक्रवारी पहिला दिवस होता. त्यामुळे बस सुरु झाल्याचे अनेकांना खरे वाटत नव्हते. त्यामुळे पहिल्यादिवशी प्रवाशांचा रिस्पॉन्स कमी होता. त्यात रविवारची शासकीय सुट्टी आणि सोमवारी येत असलेल्या इदच्या सणामुळे प्रवाशांची फारशी गर्दी दिसणार नाही. परंतु, मंगळवारपासून एसटीला जिल्ह्यांतर्गत भरघोस प्रवासी मिळतील, एसटीचे थांबलेले उत्पन्न सुरु होईल.
-आर. टीपराळे (बसस्थानक प्रमुख) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: Double the number of passengers on the second day