
कोरोना महामारीने माणुसकीमध्ये दुरावा निर्माण केला असून आता आपले कोण जवळचे आहेत, याचीही प्रचिती आणून दिली आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत नांदेडला ‘हॅपी क्लब’ने महामारीला मानवतेची संधी समजून कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला आहे.
नांदेड - कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी कोरोनाच्या धास्तीने जवळचे नातेवाईकसुद्धा धजावत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कोरोना महामारीने माणुसकीमध्ये दुरावा निर्माण केला असून आता आपले कोण जवळचे आहेत, याचीही प्रचिती आणून दिली आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत नांदेडला ‘हॅपी क्लब’ने महामारीला मानवतेची संधी समजून कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला आहे.
नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन (पॉझिटिव्ह थिंकिंग) ठेवा म्हणून इतरांना सल्ला देणारे अनेकजण कोरोनाचे नाव ऐकले की, लगेचच फरार होतात. पॉझिटिव्ह विचार कधी निगेटिव्ह होतात, हे त्यांचे त्यांना देखील कळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कितीही जवळच्या जीवाभावाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच मरणाच्या भीतीने जीवंतपणीच काय पण मरणानंतर देखील त्या जीवाभावाच्या व्यक्तीजवळ जाण्याची हिंमत कुणीच करत नाहीत. अंत्यविधीलाही उपस्थित राहत नाहीत. अशा स्थितीत ‘हॅपी क्लब’चे सदस्य पुढे आले आहेत. तेही कुठल्याही आशा, अपेक्षेशिवाय. मोठ्या धाडसाने अगदी रितीरिवाजाप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे धाडस त्यांनी दाखवले असून ते थक्क करणार आहे.
हेही वाचा - प्रवेश पंधरवाड्याने शैक्षणिक सत्रास सुरवात
अंतिमसंस्कार करण्याचे कार्य
नांदेडला एप्रिल महिन्यात २२ तारखेला जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. त्या दिवसापासून आत्तापर्यंत २५६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या दरम्यान उपचार घेताना १३ रुग्णांचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांकडून कोरोना पॉझिटिव्हने मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. परंतु त्यानंतर मागील काही वर्षापासून बेवारस व्यक्तीवर अंतिमसंस्कार करण्याचे कार्य करणाऱ्या हॅपी क्लबचे मेंबर मोहमंद सोहेब यांनी पुढाकार घेतला.
हेही वाचा - साध्या पद्धतीने लग्न करुन कोरोना योद्धांचा सन्मान
खूप मोठी जोखीम पत्करत कार्य
दरम्यान त्यांना राशन किट वाटपा दरम्यान स्वतःची कशी काळजी घ्यायची याबद्दल महापालिकेच्या वतीने प्रशिक्षण मिळाले होते. त्याचा हॅपी क्लबला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अंत्यविधी करण्यासाठी फायदा झाला. त्यांना पुढील कोरोना पॉझिटिव्हने मृत्यू झालेल्या रुग्णावर अंतिमसंस्कार करण्याची सर्व ती जवाबदारी घेतली आहे. दरम्यान, त्यांना हे करत असताना खूप मोठी जोखीम पत्करावी लागत आहे. जिथे नाही कोणी? तिथे आम्ही. या युक्तीप्रमाणे मोठ्या धाडसाने त्यांनी हे काम सुरु केले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत असले तरी त्यांना घरातून काही प्रमाणात विरोधदेखील पत्कारावा लागत आहे.
कोरोनाने पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी रुग्णवाहिका रुग्णालयातून स्मशानभूमीत नेणे. त्या ठिकाणी देखील मृतदेह जाळण्यास किंवा पुरण्यास नागरीकांचा विरोध होतो. अशा स्थितीत मात्र त्या कोरोना योद्धांना स्वतःवर संयम ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अनेक वेळा त्यांना पोलिस बंदोबस्तात त्या व्यक्तीवर अंतिम संस्कार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, हे कोरोना योद्धा कुठल्याही समाजामधल्या मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे त्यांच्यासाठी प्रार्थना करुन त्यानंतरच त्या व्यक्तीवर अंतिम संस्कार करतात.
मरन कुणालाही चुकलेले नाही
कोरोना आजार सर्वांसाठी नवीन आहे. मात्र मेल्यानंतर ही त्या पॉझिटिव्ह मृत देहावर अंतिम संस्कार करण्यासाठी अंतिमसंस्कार करण्यास विरोध होतो. ही खेदजनक बाब आहे. थोडा विचार करुन बघा त्या व्यक्तीच्या जागी कधी आपल्याही घरातील कुणी व्यक्ती असु शकते तेव्हा काय? समाजाने मानसिक दृष्ट्या बदलणे गरजेचे आहे. प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
-मोहम्मद सोहेब (हॅपी क्लब)