
मागील सुमारे साठ दिवसांपासून ठप्प असलेली व रोज कोटी रुपयांचा तोटा सहन करत असलेली लालपरी शुक्रवारी (ता.२२ मे) जिल्ह्यांतर्गत धावली.
नांदेड : जिल्ह्यांतर्गत बस सुरु होणार असल्याचा शासनाचा आदेश निघाला असला तरी, गुरुवारी (ता.२१ मे) संध्याकाळपर्यंत नांदेड जिल्ह्यांतर्गत लालपरी धावणार की नाही? याबद्दल जिल्हाप्रशासन व एसटी महामंळाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यात संभ्रमावस्था होती.
महामंडळाचा हा निर्णय राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी समान असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. त्यामुळे लालपरी सुरु करण्यास हरकत नसल्याची माहिती महामंडळाचे विभागीय अधिकारी अविनाश कचरे यांना रात्री उशीरा दिली. परिणामी शुक्रवारी (ता.२२ मे) सकाळापासून जिल्ह्यांतर्गत रस्त्यावर लालपरी धावत असल्याने अनेक नागरीकांना डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
विभागीय अधिकारी अविनाश कचरे, विभागीय वाहतुक अधिकारी संजय वाळवे, आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे यांनी तातडीने शुक्रवारी बस सुरु करण्यासाठी नियोजन केले. त्यानुसार नांदेड मुख्य आगार, हदगाव, भोकर, कंधार, बिलोली, मुखेड व देगलुर असे जिल्ह्यांतर्गत बसचे नियोजन करुन बस मार्गस्थ केल्या.
हेही वाचा- मित्रांसोबत पार्टीला गेला, अन् पुढे काय झाले ते वाचाच
पहिल्या दिवशी प्रवाशांची मारामार
अचानक बस सुरु झाल्याने पहिल्या दिवशी दुपारपर्यंत बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला. तरी देखील ठरल्याप्रमाणे नांदेड बस डेपोतून नियोजनाप्रमाणे २२ गाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु त्या विना प्रवाशी धावत असल्याचे दिसून आले. लोकांना बस सुरु होणार याची पूर्व कल्पना असती तर अनेक बसमध्ये आणि स्थानकात प्रवाशी दिसून आले असते. परंतु अचानक सुरु झालेल्या महामंडळाच्या बसेसला पहिल्या दिवशी बोटावर मोजण्याइतकेच प्रवाशी घेऊन धावावे लागले. शनिवारपासून मात्र प्रवाशी संख्येत अधिक भर पडु शकते असे मत महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगीतले.
असे आहे जिल्ह्यांतर्ग नियोजन
आगाराचे नाव | गाडी संख्या | फेऱ्या |
नांदेड | २२ | १३२ |
भोकर | आठ | ५६ |
किनवट | चार | १४ |
मुखेड | १४ | ७८ |
देगलुर | नऊ | ४८ |
कंधार | १० | ७४ |
हदगाव | पाच | ३४ |
बिलोली | १० | ६२ |
माहूर | तीन | १२ |
शुक्रवारी तात्पूर्ता स्वरुपात एकुण ८५ गाड्यांचे नियोजन तयार करण्यात आले असून, दिवसभरात या गाड्या ५१० फेऱ्या करणार असल्याची माहिती विभागीय वाहतुक अधिकारी संजय वाळवे यांनी दिली.
येथे क्लिक कराच - ‘दोन घास उरवून दोन घासावरच जगतो आहे’...!
चालक - वाहक प्रवाशांनी सुचनांचे योग्य पालन करावे
महामंडळाकडून गाडी सोडण्यापूर्वी बसचे निर्तुकिकरण करणे, चालक वाहक यांना त्रास होउ नये यासाठी एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना टिकीट देऊन त्यांना ठरलेल्या सिटवर बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. प्रवाशांनी देखील बसस्टॅंड व गाडीत चढण्यापूर्वी तोंडाला मास्क व प्रवासा दरम्यान समान अंतर राखणे बंधन कारक आहे.
- पुरुषोत्तम व्यवहारे (आगार प्रमुख)