Video - ॲन्टीजेन तपासणीस नांदेडमध्ये प्रतिसाद

अभय कुळकजाईकर
Wednesday, 5 August 2020

नांदेड शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारेही तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड शहरात त्याचबरोबर ग्रामिण भागातही टेस्ट घेण्यात येत आहेत.

नांदेड - ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे नांदेड शहरासह जिल्ह्यातही तपासणी करण्यात येत असून त्यास नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला आहे. नांदेड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात जाऊन ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘होम आयसोलेशन’ची सुविधाही महापालिका उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.

नांदेड शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारेही तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड शहरात त्याचबरोबर ग्रामिण भागातही टेस्ट घेण्यात येत आहेत. त्यासाठी जवळपास पाच हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. नांदेड शहरात महापालिकेच्या वतीने विविध भागात जाऊन विशेष करुन ज्या ठिकाणी कोरोना बाधित जास्त संख्येने आढळून आले आहेत. त्या भागात ज्येष्ठ नागरिक व मुलांचे तसेच आजारी असलेल्या व्यक्तींचीही प्रामुख्याने ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

हेही वाचा - पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला नांदेडचा आढावा  
 

होम आयसोलेशनची सुविधा 
नांदेड महापालिकेच्या वतीने कोरोना बाधितांसाठी शहरात विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारेही तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर होम आयसोलेशनचीही सुविधा उपलब्ध करण्यात येत असून त्यासाठी दोन डॉक्टर आणि १५ शिक्षक यांचे एक पथकही निर्माण केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.

खासगी कोविड रुग्णालयाचे आॅडिट होणार
दरम्यान, शहरात कोरोना बाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच दर आकारणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर रुग्णांकडून कोणतीही आर्थिक लूट होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयाचे आॅडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिले आहेत. शहरात सध्या पाच खासगी रुग्णालयाद्वारे कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये योग्य पद्धतीने उपचार करण्यात येतात का तसेच शुल्क योग्य आकारले जाते का? याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेतर्फे एक समिती नेमण्यात आली असून त्यात महापालिकेचे उपायुक्त विलास भोसीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाप्रसाद कुंटुरकर, मुख्य लेखा परिक्षक शोभा मुंडे आदींचा समावेश आहे. 
 
हेही वाचलेच पाहिजे - Corona Breaking, हिंगोलीचे जिल्हाधिकारी पॉझिटिव्ह

कोरोनाला घाबरुन जाऊ नये
नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे, जेणेकरुन मृत्यूचे प्रमाण रोखता येईल. नागरिकांनी कोरोनाला घाबरु नये, काळजी घ्यावी आणि तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन तसेच आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे. त्याचबरोबर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Response to antigen test in Nanded, Nanded news