Video - नांदेडच्या गोदावरीची अशी आहे चित्तरकथा, कशी? ते वाचाच  

Nanded News
Nanded News

नांदेड : एखाद्या लोकसंस्कृतीचा वारसा ही शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदीदेखील असू शकते. नेमके हेच भाग्य नांदेडला गोदावरीच्या रुपाने लाभले आहे. मात्र, तिचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. नांदेड शहरातील अनेक नाले, मैला नदीत मिसळत असल्याने गोदामातेचा श्वास दिवसेंदिवस गुदमरत चालला आहे.

दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नांदेड खऱ्या अर्थाने मुबलक पाण्यामुळे सुखावलेले. त्यातच कौ. शंकरराव चव्हाणांनी वाॅटर बॅक विष्णुपुरी प्रकल्प उभारून परिसर सुजलाम सुफलाम केला. पण याचे पावित्र्य टिकवण्यात प्रशासन मागे पडले आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याचे शुद्धीकरण न करता दुर्गंधीयुक्त ठेवण्यातच प्रशासन कमालीचे यशस्वी झाले आहे.  

असे होते पूर्वीचे वैभव
दुसरी बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी गोदावरी नदी व नदीचा परिसर सुंदर व रमणीय होता, कारण नदीच्या परिसरात प्रचंड वृक्ष होते. त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी व पर्यटक पक्षी येथे यायचे. तसेच नदीला प्रचंड वाळूसाठा असल्यामुळे कासव व इतर जलचर प्राणी नदीकाठी पाहायला मिळायचे. काही लोकांच्या स्वार्थापोटी व महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नदी परिसरातील झाडे तोडण्यात आली. तसेच दरवर्षी क्षमतेपेक्षा वाळू उपसा जास्त प्रमाणात करण्यात येत आहे. परिणामी पर्यटक पक्षी व कासव पूर्ण पणे संपले. 

गोदीवरीच्या पात्रात घाणीचे साम्राज्य
गोदावरी नदी आपण पवित्र मानतो. परंतु, काही लोक टाकाऊ वस्तू कॅरीबॅगमध्ये घालून नदीमध्ये फेकतात. त्यामुळे आज गोदावरी नदीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नदीला स्वच्छ करण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली पाहिजे. २०० कोटी रुपये खर्च करूनही शहरातील नाले, ड्रेनेजलाईनचे पाणी गोदावरीच्या पात्रात मिसळत आहे. परिणामी त्याचे दुष्परीणाम आपणा सर्वांनाच आज भोगावे लागत आहे.

गोदावरीचे पावित्र्य जपणे आवश्यक
गोदावरीच्या प्रदूषणाला प्रशासनाइतकेच नागरिकही जबाबदार आहेत. आज मानव स्वतःपुरताच विचार करीत आहे. पूजेचे साहित्य, जाळलेल्या मृतदेहांची राख नदीच्या पात्रत टाकून आपणच गोदावरीचे सौंदर्य बिघडवत आहोत. महापालिकेने कुठलाही विचार न करता ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनीही नांदेड शहराचे वैभव असलेल्या गोदावरीचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे.

मच्छिमारांच्या उपजिविकेचा प्रश्न ऐरणीवर
गोदावरी नदीमध्ये कतला, रोहू, मिगल, सिप्रिनस, गौत्या, चंदेरी, कोळेशी, रोहीटी, सिंगाडा, पातूला, आट्टू, मरळ, पुंगटी, बोराळी, वाम, तिलापीया आदी निरनिराळ्या प्रजातीचे मासे आढळतात. कतला व रोहू, सिप्रिनसला ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी असते. या नदीमुळे शहरात चार ते पाच मासळी बाजार निर्माण होऊन ते अनेकांसाठी उपजिविकेचे साधन ठरले आहे. परंतु, नदी विविध कारणांनी प्रदूषीत होत असल्याने जलचरसृष्टी धोक्यात येत आहे.

अभियान नावालाच
नदी पात्राच्या दुतर्फा अनधिकृतरित्या वाळू उपसा होत आहे. तो रोखण्यास स्थानिक सरकारी यंत्रणेला अपयश येत असल्याने नदीला धोका निर्माण झाला आहे. गोदावरी नदी काठालगत स्वच्छतेसाठी विविध संस्था, संघटनांसह राजकीय पदाधिकारी पुढाकार घेतात. त्यांचा प्रयत्न चांगला असला तरी त्यात सातत्य नसल्याने आणि याप्रश्नी सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेमुळे स्वच्छता अभियान केवळ चमकोगिरीसाठी होते की काय?, अशी शंका आता उपस्थित होत आहे.  

नांदेडकरांचीही आहे जबाबदारी
दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी प्रदूषणामुळे संकटात आहे. गोदावरीमुळे नांदेड जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे तिचे संवर्धन करणे प्रशासनच नाहीतर नांदेडकरांचीही जबाबदारी आहे.  
- प्रा. डाॅ. किरण शिल्लेवार, सायन्स काॅलेज नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com