Video - नांदेडहून पश्‍चिम बंगालला श्रमिक रेल्वे रवाना

अभय कुळकजाईकर
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोना आणि लॉकडाउनमुळे पश्‍चिम बंगालमधील अनेक सुवर्णकार मराठवाड्यातील विविध शहरांमध्ये अडकले होते. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नांदेडहून पश्‍चिम बंगालमध्ये कोलकत्ता येथे जाण्यासाठी श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सात वाजता हे कारागीर रेल्वेने रवाना झाले. 

नांदेड - नांदेडसह परभणी, हिंगोली, गंगाखेड, बीड, लातूर, उदगीर, केज आदी भागातील जवळपास एक हजार सुवर्ण कारागिरांना घेऊन श्रमिक रेल्वे नांदेडहून शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सात वाजता पश्‍चिम बंगालकडे कोलकत्याला रवाना झाली. तब्बल दोन महिन्यानंतर आपआपल्या गावी जायला मिळणार असल्याने सुवर्ण कारागीरांसह त्यांचे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे पच्शिम बंगालमधील अनेक सुवर्णकार मराठवाड्यातील विविध शहरांमध्ये अडकले होते. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नांदेडहून पश्‍चिम बंगालमध्ये कोलकत्ता येथे जाण्यासाठी श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सात वाजता हे कारागीर रेल्वेने रवाना झाले.
 
हेही वाचा - कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ

अधिकारी, पदाधिकारी उपस्थित
नांदेड रेल्वेस्थानकावर यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार सुजीत नरहरे, विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, सराफा संघटनेचे अध्यक्ष सुधाकर टाक यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने केली सोय 
कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यापासून पच्शिम बंगालमधील सुवर्ण कारागिर अडकले होते. नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर, बीड आदी जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या बंगाली सुवर्ण कारागीरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या सर्वांची सोय रेल्वेमार्फत करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या बाबत त्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे रेल्वेची मागणीही केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने या मजूरांसाठी रेल्वेची मोफत सोय शुक्रवारी करण्यात आली.
 
हेही वाचलेच पाहिजे - Video -  मधुमेहींनी कोरोनापासून अशी घ्यावी काळजी - डॉ. संतोष मालपाणी

सराफा असोसिएशनची मदत 
यासाठी जिल्हा प्रशासनासह नांदेड सराफा असोसिएशन तसेच एकता सुवर्णकार कारागीर असोसिएशन यांनी सहकार्य केले. कारागीरांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नांदेड सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर टाक, महेमूद भाई बंगाली, राजाभाई, रहेमान, सुमित बंगाली, लालटू बंगाली आदींनी पुढाकार घेतला. नांदेड रेल्वेस्थानकावर सकाळी आठ वाजल्यापासूनच बंगाली कारागीरांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Workers train from Nanded to West Bengal, Nanded news