नांदेड : ५५ हजारांचा भरणा करून मिर्झा बेग झाले थकबाकीमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vilasrao Deshmukh Abhay Yojana Mirza Qasim Beg Mirza Mahboob Beg Arrears free nanded

नांदेड : ५५ हजारांचा भरणा करून मिर्झा बेग झाले थकबाकीमुक्त

नांदेड : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे. नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांची संख्या सुमारे चार लाख ४० हजार १९० असून या योजनेमुळे त्यांच्याकडील सुमारे ४६१ कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीला गती मिळणार आहे. या नव्या योजनेचा लाभ घेत आनंदनगर कार्यालयातंर्गत येणारे घरगुती ग्राहक मिर्झा कासिम बेग मिर्झा महेबूब बेग यांनी १३ हजार ७६० रूपयांची माफी मिळवत ५५ हजार १३० रूपयांचा एकरकमी भरणा केला आहे.

कोरोनाकाळात कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या उद्योग-व्यवसायांना दिलासा देणारी ही योजना आहे. या ग्राहकांना योजनेत थकबाकी भरून पुन्हा आपले उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आहे. या योजनेचा कालावधी ता. एक मार्च ते ता. ३१ ऑगस्ट पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. ता. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे.

या शिवाय थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के तर लघुदाब ग्राहकांना दहा टक्के थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळणार आहे. या योजनेत सुलभ हप्त्याने रक्कम भरावयाची सुविधा आहे परंतु त्यासाठी मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना उर्वरीत रक्कम सहा हप्त्यात भरता येईल. योजनेच्या लाभार्थी ग्राहकाने हप्त्यांची उर्वरित रक्कम भरली नाही तर माफ केलेली व्याज व विलंब आकाराची रक्कम वीजबिलात पूर्ववत लागू करण्यात येणार आहे.

नांदेड परिमंडळात डिसेंबर २०२१ अखेर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांची संख्या चार लाख ४० हजार १९० एवढी असून त्यांच्याकडे ४६१ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात नांदेड जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार ९५० ग्राहकांकडे ११३ कोटी ९७ लाख, परभणी जिल्ह्यातील एक लाख २७ हजार ६०६ ग्राहकांकडे २४६ कोटी आठ लाख तर हिंगोली जिल्ह्यातील ९६ हजार ६३४ ग्राहकांकडे १०१ कोटी एक लाख रुपयांची थकबाकी आहे. या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

Web Title: Vilasrao Deshmukh Abhay Yojana Mirza Qasim Beg Mirza Mahboob Beg Arrears Free Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..