राहाटीचा (ता.नांदेड) लोकसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

प्रमोद चौधरी
Tuesday, 8 September 2020

प्लाॅट नावावर करून देण्यासाठी राहाटी ग्रामपंचयतचा ग्रामविकास अधिकाऱ्याला एक लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले.

नांदेड :  राहाटी (ता.नांदेड) येथील प्लॉट नावावर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख ५० हजार रुपये घेतल्याप्रकरणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हनमंत वाडेकर आणि त्यांचा खासगी सहकारी बालाजी वाघमारे यांना एक लाख ५० हजार रुपयांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (ता.आठ) करण्यात आली.

राहाटी येथील तक्रारदार यांचा राहत्या घराचे बाजुला गावठाणचा प्लाॅट आहे. हा प्लाॅट ५० वर्षांपासून त्यांच्याच ताब्यात आहे. हा प्लाॅट नावावर करण्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतकडे रितसर प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, सदर प्लाॅट नावावर करायचा असेल तर एक लाख ५० हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील, असे ग्रामविकास अधिकारी हनमंत वाडेकर यांनी सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड कार्यालय गाठून तक्रार दिली.

हेही वाचा - Video - नांदेडमधील कोरोना बाधित रुग्णांना साईप्रसादचा आधार

राहाटी येथील तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.आठ) लाचलुचपत विभागातील कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष राहाटी येथे जावून पडताळणी केली. त्यात लोकसेवक श्री. वाडेकर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर श्री. वाडेकर यांच्या विस्तारीत नाथनगर नांदेड येथील घराच्या परिसरामध्ये सापळा रचला. श्री. वाडेकर यांचे खासगी सहकारी बालाजी वाघमारे यांच्याकडून एक लाख ५० हजार रुपये स्वीकारतांना लोकसेवक वाडेकर यांच्यासह खासगी सहकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.  त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश पुरी करत आहेत.

ही कारवाई पोलिस अधिक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुरी, कपील शेळके, एकनाथ गंगातिर्थ, दर्शन यादव, नरेंद्र बोडके, आशा गायकवाड यांनी केली.

हे देखील वाचलेच पाहिजे - मराठवाड्यासह परभणीकर जिंकले! ७०ः३० फॉर्मुला रद्द

कुंडलवाडीच्या नगराध्यक्षा अपात्र
नांदेड ः कुंडलवाडी पालिकेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा विठ्ठल कुडमुलवार यांनी मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने त्यांना अपात्र ठरविले आहे. तसे आदेशही नगर विकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांनी सोमवारी रात्री उशीर आदेश जारी केले आहेत. २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष हे पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) राखीव होते. भाजपकडून डॉ. अरुणा कुडमूलवार यांनी तर कॉंग्रेसतर्फे अर्चना पोतनकर यांनी ही निवडणुक लढवली. त्यात डॉ. कुडमूलवार विजयी होऊन नगराध्यक्षपदी रुजु झाल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Development Officer Redhanded Taking Bribe Nanded News