Video - ग्रामस्थांनी एकत्र येवून लोहा गावचा शिवार केला हिरवागार 

प्रमोद चौधरी
Monday, 21 September 2020

हदगाव-तामसा रोडवरील पाच किलोमिटर आत असलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या लोहा गाव. एकोप्याचे दर्शन घडविणारे हे गाव मात्र विकासापासून दूरच आहे.  

नांदेड : डोंगरदऱ्यामध्ये हदगाव-तामसा रोडवर पाच किलोमीटर आतमध्ये लोहा गाव आहे. निसर्गाच्या कुशीत रमलेले हे गाव नयनरम्य दृश्याचा आनंद देणारे आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने येथे नांदत असून तळ्याच्या निर्मितीसोबतच शिवारही फळझाडे व वनौषधी लावून हिरवेगार केले आहे. मात्र, विकासापासून लोहा गाव अद्यापही दूरच आहे. 

सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव लोहा. हदगाव-तामसा रोडवर या गावला जाण्यासाठी फाटा आहे. या फाट्याहून पाच किलोमिटर अंतरावर गेलो की आपल्या नजरेला निसर्गाच्या कुशीत वसलेलं लोहा गाव दिसतं. गावातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. चारही बाजूने डोंगरदऱ्या आहेत. या गावात सर्वच जाती-धर्माचे लोक रहात असून, ते सर्व एकोप्याने राहतात. सर्वांनी मिळून गावाच्या थोड्या अंतरावर दोन डोंगराच्या कडेला तळ्याची निर्मिती केली. याच साठलेल्या तळ्याच्या निर्मळ पाण्यावर या गावाचा हिरवा शिवार मोठ्या ऐटीत डोलतांना बघायला मिळतो. 

हेही वाचा - दत्ता बापूंनी जमिनीशी नातं कधीच तुटु दिले नाही

नेहमीपेक्षा यावर्षी प्रचंड पाऊस या परिसरात झाल्यामुळे लोहा गावचे हे तळे पाण्याने भरुन वाहत आहे. या तळ्याचे वाहणे म्हणजे या गावातल्या प्रत्येकाचा जीवनाचा आनंदच वाहत असल्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत राठोड, विलास कौशल्ये यांनी दिली. सध्या या परिसरात निसर्गरम्य, प्रसन्न वातावरण असून हिरवीगार मोठ मोठी झाडेही आहेत. यामध्ये सिताफळाची झाडे सध्याला फळाने फुलून गेलेली आहेत. या वनराईमुळे विविध पक्षी, प्राणी व सुंदर रुपाने नटलेली बहुसंख्ये जातीची फुलपाखरंही पाहता येतात. वनौषधीही या परिसरात भरपूर असल्याने निसर्गनिर्मीत अनेक प्रकारच्या रानभाज्यांचा स्वाद येथे घेता येतो. 

हे देखील वाचाच - आमदार बाबाजानी दुर्रानी यांना जिल्हा बँकेचे संचालक पद पुन्हा बहाल   
 
या आहेत गावाच्या समस्या 

  • गावामध्ये इयत्ता सातवीपर्यंत शाळाअसून तिचेही काम अपूर्णच आहे. 
  • कच्च्या रस्त्यांमुळे ग्रामस्थांना होतो त्रास 
  • नळ योजना आहे पण कार्यान्वीत नाही. 
  • सतत लोडशेडिंग 
  • कायम आरोग्य वैद्यकीय अधिकारी असायला पाहिजे. परिचारिका आणखी एक वाढविण्याची गरज आहे. 
  • व्यायामशाळा नाही 
  • बचतगटाच्या महिलांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शनाची गरज 
  • कायमस्वरूपी पोस्टमन नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानदारही नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Villagers Together And Made Loha Village Green Nanded News