सावधान : नांदेड जिल्ह्यात तोतया पोलिसांचा संचार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

दागिणे काढून द्या अन्यथा आपल्यावर कारवाई केल्या जाईल अशी धमकी देऊन २० हजाराचे सोन्याचे दागिणे लंपास करणाऱ्या तोतया पोलिसांविरुद्ध लिंबगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : आम्ही पोलिस असून आपल्याकडील सोन्याचे दागिणे हे चोरीचे आहेत, त्याबद्दल आम्हाला अटक चोरांनी माहिती दिली. ते दागिणे काढून द्या अन्यथा आपल्यावर कारवाई केल्या जाईल अशी धमकी देऊन २० हजाराचे सोन्याचे दागिणे लंपास करणाऱ्या तोतया पोलिसांविरुद्ध लिंबगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड तालुक्यातील धानोरा मालकु येथील बाबूराव गणपती पाटील (वय ६५) हे शेतकरी हे आपल्या शेताकडून घराकडे जात होता. लिंबगाव कॅम्प दरम्यान दुचाकीवरुन बुधवारी (ता. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास जात होते. त्यांची दुचाकी कॅम्प परिसरात येताच एका दुचाकीवर थांबलेल्या दोन युवकांनी (वय अंदाजे २५ ते ३०) यांनी श्री. पाटील यांची दुचाकीला थांबविली. आम्ही पोलिस असून एका गंभीर गुन्ह्याचा तपास करत आहोत. आम्ही अटक केलेल्या चोरट्याने आपणास दागिणे विकले आहे असे सांगितल्याने आम्ही आपल्या मागावर होतो. आपल्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या ह्या चोराने तुम्हाला विकल्या आहेत. त्या तुम्ही वाद न करता काढून द्या अन्यथा आपणास चोरीच्या गुन्ह्यात अटक करु अशी धमकी दिली. 

हेही वाचा -  धक्कादायक : देहविक्रीसाठी मुलींना पळविणारी टोळी जेरबंद

सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वांभर पल्लेवाड यांनी घटनास्थळी भेट

भयभीत झालेल्या श्री. पाटील यांनी आपल्या हातातील दोन्ही अंगठ्या काढून दिल्या. त्यानंतर हे तोतया पोलिस घटनास्थळावरून पसार झाले. शेतात जावून श्री. पाटील यांनी आपल्या नातेवाईकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावरुन त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. लगेच त्यांना घेऊन लिंबगाव पोलिस ठाणे गाठले. बाबूराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन लिंबगाव पोलिसांनी अज्ञात तोतया पोलिसांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वांभर पल्लेवाड यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री. जहागीरदार करत आहेत. 

नांदेड जिल्ह्यात पुन्हा तोतया पोलिसांचा वावर

जिल्ह्यात सध्या लॉकडाउन सुरू असल्याने पोलिस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त आहे. याचा फायदा अज्ञात चोरटे व सराईत गुन्हेगार घेत आहेत. ग्रामिण भागात किंवा शहरी भागातील एकट्या वृद्धाला गाठणे, त्यांना काही तरी बतावणी करणे आणि आम्ही पोलिस असल्याचे सांगुन लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. नुकताच लिंबगाव (ता. नांदेड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धाला लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तोतया पोलिसांची टोळी सक्रीय झाली की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning: Communication of duplicate police in Nanded district