सावधान : अर्धापुरात बिबट्या पडला विहिरीत; रेस्क्यु आॅपरेशन सुरु

लक्ष्मीकांत मुळे
Thursday, 14 January 2021

रोडगी शिवारात अनिल कदम यांचे शेत आहे. या शेतात एक पडीत विहीर असून या विहिरीचा फारसा उपयोग करण्यात येत नाही. या पडक्या विहीरीत बुधवारी (ता. 13) रात्री बिबट्या पडला असावा असा प्राथमिक आंदाज आहे.

अर्धापूर (जिल्हा नांदेड ) : रोडगी (जिल्हा नांदेड ) शिवारातील विहिरीत बिबट्या पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यु आॅपरेशन सुरु झाले आहे. वनविभाग, पोलिस यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी झाली आहे.

रोडगी शिवारात अनिल कदम यांचे शेत आहे. या शेतात एक पडीत विहीर असून या विहिरीचा फारसा उपयोग करण्यात येत नाही. या पडक्या विहीरीत बुधवारी (ता. 13) रात्री बिबट्या पडला असावा असा प्राथमिक आंदाज आहे.

शेतातील नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी सालदार, कदम कुटुंबीय आले. ही विहीर उपयोगात नसल्यामुळे कोणी तिकडे लक्ष दिले नाही. पण सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याने डरकाळी फोडून आपल्या अस्तित्वाची जाणिव करुन दिली. डरकाळीचा आवाज विहिरीकडून आल्याने शेतातील नागरिक विहिरीकडे धावले. बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गावात ही वार्ता पसरली.

हेही वाचा -  बरडशेवाळा येथील गुळाची चवच भारी; पन्नास कामगारांच्या हाताला काम

सदरील घटनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यांनंतर वनविभाग, पोलिस ठाणे यांचे अधिकारी पथक घेऊन दुपारी हजर झाले. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान ही वार्ता गावात पसरल्यानंतर बघ्यांनी परिसरात एकच गर्दी केली. त्यामुळे शेतातील हाळद, हरभरा पिकाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. वनविभाग बिबट्याला बाहेर काढण्यासाठी यंत्रणा मंद गतीने हालवत असल्यामुळे या रेस्क्यु आॅपरेशनला वेळ लागत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning: Rescue operation started in Ardhapur nanded news