धर्माबादेत शेकोट्या पेटवून पिकांना पाणी

dhrmabad.jpg
dhrmabad.jpg


धर्माबाद (जि. नांदेड) : एकीकडे थंडीने हुडहुडी भरते आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरलेली असताना धर्माबाद तालुक्यात रात्रीच्या वेळी कृषीपंपांना होणाऱ्या विजपुरवठ्याने संपुर्ण रात्रच शेतात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत, नव्हे त्यांच्यासमोर संकट उभे टाकले आहे. 

आलटून-पालटून थ्रीफेज वीजपुरवठा 
यावर्षी निसर्गाच्या प्रकोपाने खरीप हंगामाने धोका दिला आहे. सोयाबीन पीक गेले. कापसाची भयानक परिस्थिती असून हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे. उत्पन्न कमी आणि कापसाला भावही कमी असून खासगी व्यापाऱ्यांच्या घशात उत्पादित केलेला कापूस गेला. आता रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू हे पीक घेऊ आणि खरिपाची थोडी कसर रब्बी हंगामात भरून काढू म्हणून शेतकरी रब्बी पेरण्यांकडे वळला आहे. ज्वारी, हरभरा, गहू पिकांना पाणी देणे चालू आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी ओलीताच्या कामासाठी सज्ज झाला. मात्र विजेची समस्या धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. ओलितासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना वीजपुरवठा केला जातो. एक आठवडा दिवसा व दुसरा आठवडा रात्री असा आलटून-पालटून थ्रीफेज वीजपुरवठा दिला जातो. 

रात्रभर शेकोट्या पेटवून पिकांना पाणी 
रात्री दहा ते सकाळी आठ या वेळेत वीजपुरवठा होत असला तरी मध्ये कित्येक वेळा वीज गुल कधी होईल याचा नेम नाही. असे शेतकरी बोलून दाखवीत आहेत. रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी थोडाही वेळ वाया घालवत नाहीत. रात्री पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना व सालगड्यांना आपला जीव धोक्यात घालून ओलीती करावी लागत आहे. रात्रीला रानडुक्करे, सरपटणारे प्राणी, किडे यांची भीती आहे. त्यांच्यापासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. हिंस्त्र प्राण्यांचे मानवावर हल्ले, सर्पदंश यासारखे प्रकार तालुक्यात अनेक वेळा घडलेले आहेत. ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी थंडी व थंड पाण्याचा सामना करावा लागतो. थंडीत ऊब मिळावी यासाठी शेतात रात्रभर शेकोट्या पेटवून पिकांना पाणी दिले जात आहे. 

शासनाच्या धोरणालाच अधिकाऱ्यांचा हरताळ
शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना दिवसा ८ तासांचा तर रात्री १० तासांचा वीजपुरवठा कृषिपंपासाठी देण्यात येतो. मात्र तालुक्यात बहुतांशी वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाला स्थानिक अधिकाऱ्यांकडून हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी झालेला परतीचा सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांकडील विहीर, बोअर आदी जलस्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. एकीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतांना दुसरीकडे मात्र विजवीतरण कंपनीच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा करण्याऐवजी सकाळी वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com