वेबिनार : जागर बालरक्षकाचा आणि बाल हक्क संरक्षणाचा

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 30 September 2020

सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडीताई, मुख्याध्यापक, शिक्षक, बालरक्षक यांची तालुकास्तरीय ऑनलाइन संवाद कार्यशाळा

नांदेड : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड, शिक्षण विभाग, जि. प. नांदेड, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, नांदेड, शिक्षण विभाग, पंचायत समिती, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट तालुक्यातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडी ताई,मुख्याध्यापक, शिक्षक, बालरक्षक यांचेसाठी बालरक्षक आणि बाल हक्क संरक्षण या विषयावर ऑनलाईन संवाद कार्यशाळेचे आयोजन बुधवारी (ता. ३०) सप्टेंबर रोजी करण्यात आले. या कार्यशाळेला विविध विभागातील ४७७ जणांची उपस्थिती होती.

किनवट तालुक्यातील सहा ते चौदा वयोगटातील बालक शाळाबाह्य राहू नये आणि सर्व बालकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे याकरिता लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक:- या ऑनलाईन कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री. अभय परिहार,अधिव्याख्याता तथा तालुका संपर्क अधिकारी, किनवट यांनी करताना कार्यशाळेची थोडक्यात रूपरेषा- बालकांना प्राप्त असलेल्या चार प्रकारचे हक्क, बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायदे व यंत्रणा आणि किनवट तालुका शाळाबाह्य बालक मुक्त तालुका म्हणून ओळखला निर्माण व्हावी याकरिता लोक चळवळीच्या माध्यमातून सरपंच एसएमसी अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक यांचे सहकार्य मिळविण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित केल्याचे नमूद केले. 

हेही वाचाजन्मदात्या आईने केला तीन वर्षाच्या मुलाचा खून 

शाळाबाह्य विद्यार्थ्याला शिक्षण प्रवाहात आणणे ही मोठी जबाबदारी 

डायट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना शाळाबाह्य विद्यार्थ्याला शिक्षण प्रवाहात आणणे ही मोठी जबाबदारी असून सद्यस्थितीत ज्या ठिकाणी कुटुंब व बालकांचे वास्तव्य आहे त्या ठिकाणच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा. कोवीड -१९ मुळे स्थलांतराच्या कारणामुळे शाळा बाह्य होण्याची शक्यता बळावली आहे, शिक्षणहमी कार्ड देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात अखंडित ठेवणे, शाळाबाह्य मुले होऊ नये याकरिता सरपंच एसएमसी अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य यातून मोठे प्रयत्न करावे लागतील आणि शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि समाज सहभाग वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समाजातील सर्व सुजाण नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रेखा काळम यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विविध शासकीय यंत्रणा यांच्या समन्वयातून बालक व महिलांचे हक्क संरक्षण होईल, डायट नांदेड यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून केवळ किनवट तालुक्यातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यासाठी तालुकास्तरीय अशा कार्यशाळेचे आयोजन करावे, बालकांचे चार हक्क अंमलबजावणीसाठी समाजातील सर्व सुजाण नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता, बालकांसाठी अस्तित्वात असलेले विविध कायदे, बालविवाह, ता. १० जून २०१४ चा महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय व त्याची अंमलबजावणी, त्यासाठी ग्राम बाल हक्क संरक्षण समिती स्थापना व बालक आणि महिलांच्या हक्क संरक्षणासाठी समाजातील कोणताही घटक जिल्हा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क करण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले.

येथे क्लिक करा - नांदेड : पोक्सोमधील दोघेजण पोलिसांना शरण, सहा महिण्यापासून होते फरार

विद्या आळणे यांचे मोलाचे मार्गदर्शन

जिल्हा बाल हक्क संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या हक्काविषयी देखील विषय मांडून त्याबाबत देखील चर्चा घडून यावी, आजच्या परिस्थितीमध्ये बालविवाह होऊ नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे, बालकांसाठी उपलब्ध असलेला टोल फ्री क्रमांक चाइल्ड हेल्पलाईन १०९८ यावर घडून येणाऱ्या अप्रिय घटनेविषयी माहिती देणे, महिला संरक्षणाची जबाबदारी जिल्हा महिला व बालविकास विभागाची आहे असे नमूद केले.

अंगणवाडी ताई महत्वाच्या भुमिकेत

गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी आपल्या मार्गदर्शनात आजचा बालक, उद्याचा सुजाण नागरिक होण्यासाठी वेळीच योग्य संस्कार घडावेत, पेराल तसे उगवेल या उक्तीप्रमाणे योग्य वेळी योग्य संस्कार घडवून आणावेत, विद्यार्थ्यांच्या मनावर कोणताही मानसिक आघात होऊ नये, आईनंतर अंगणवाडी ताईच्या संपर्कात बालक जास्त वेळ येत असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि किनवट तालुका शाळा बाह्य बालक मुक्त करणे व तालुक्यातील बालक व महिलांच्या हक्काचे संरक्षण व्हावे याकरिता लोकचळवळ उभी राहून सर्वांचे सहकार्य मिळणे बाबत अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य वेळीच उपलब्ध करून देण्यात येईल याची शाश्वती दिली.

हे उघडून तर पहाभयानक वास्तव : पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन नातू पळाला तीन किलोमीटर

कार्यशाळेत उपस्थितांचा सहभाग आणि प्रतिक्रिया 

कार्यशाळेत उपस्थित असलेल्या सरपंचांनी शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये याकरिता गृहभेटी सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले. सुनिता मुंडे, सुनीता आडे, अनिता मेश्राम सर्व अंगणवाडी ताई आणि श्रीमती पांडागळे यांनी आजची कार्यशाळा हे पुढील कामकाजासाठी दिशादर्शक ठरल्याचे, ज्ञानात भर टाकणारी व स्मृतीवर चढलेली धूळ झटकण्यासाठीची कार्यशाळा असल्याचे नमूद करून, चांगले मार्गदर्शन मिळाल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली.

            


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Webinar: Awareness of Child Protection and Protection of Child Rights nanded news