बाभळी बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा काय ? प्रा. बालाजी कोम्पलवार

प्रल्हाद कांबळे
Saturday, 31 October 2020

सतत सात वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ता. २९ ऑक्टोबर ते दहा जुलै हे आठ महिने जलसाठा करून त्याचा काहीच उपयोग न करता सोडून देण्यात येत असल्याने बंधाऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी केला आहे.

नांदेड : धर्माबाद, बिलोलीसह अन्य तालुक्यातील शेती बाधीत करुन बाभळी येथे गोदावरी नदीवर बाभळी धरण बांधले. या धरणामुळे हजारो एकर शेती बाधीत झाली. परंतु उपलब्ध पाण्यावर आहे ती शेती करता येईल या आशेवर शेतकरी शांत राहिले. परंतु झाले उलटेच. सतत सात वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ता. २९ ऑक्टोबर ते दहा जुलै हे आठ महिने जलसाठा करून त्याचा काहीच उपयोग न करता सोडून देण्यात येत असल्याने बंधाऱ्याचा उपयोग काय असा प्रश्न बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी केला आहे.

बंधाऱ्यातील जलसाठ्याचा उपयोग नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचेल यासाठी उपसा जलसिंचन योजना चालू करण्यात धर्माबाद, कुंडलवाडी आणि बिलोली येथील तलावात पाणीसाठा करून शेती करावी अशी मागणी कृती समितीने केली. पण उदासीन राज्य सरकार व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याची खंत प्रा. कोम्पलवार यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी पाऊस १०० टक्के झाल्याने बाभळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. या पाणी पतळीमुळे सखल भागातील शेती पाण्याखाली येत असल्याने हजारो एकर जमिनीवरील रब्बी पिकाचे नुकसान होत असल्याने याचा सर्वे करून जमिनीचा मावेजा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचाखरीपाचे दु: ख विसरुन नांदेडमध्ये रब्बी पेरणीला सुरवात -

यावेळी अनेकांची होती उपस्थिती 

ता. २९ ऑक्टोबर रोजी पाणीपातळी ३३१. ९० मीटर म्हणजेच०. १४५ टीएमसी असून त्याच सकाळी सहा ते दीड वाजेपर्यंत १४ दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्रिस्तरीय समितीचे केंद्रीय आयोजनाचे कार्यकारी अभियंता एन श्रीनिवास राव, तेलंगाना स्टेटचे अधीक्षक अभियंता डी. सुशील, महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे, बाबळी पाटबंधारे उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता, गोदावरी विभाग हैदराबाद उपविभागीय अभियंता पडवळ, उपविभागीय अभियंता पोचमपाड, पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे, आर, के. मुक्कावार यांच्यासह धर्माबाद, बिलोली व कुंडलवाडी पसरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, जलतज्ञ, शेतकरी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the benefit of acacia dam for farmers? Pvt. Balaji Kompalwar nanded news