पालकांची कशामुळे वाढत आहे डोकेदुखी? वाचाच तुम्ही

प्रमोद चौधरी
Tuesday, 4 August 2020

मुलांना शाळेत जाण्याची ओढ लागली. तर दुसरीकडे पालकही त्रस्त आहेत. शाळेच्या जाण्याच्या काळात मुले घरी असल्याने मोलमजुरी कशी करावी, असा प्रश्‍न आता पालकांना सतावत आहे.

नांदेड : नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात झाली. मात्र, शाळांची घंटा वाजलीच नाही. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून शाळांच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मुलांना शाळेत जाण्याची ओढ लागली. तर दुसरीकडे पालकही त्रस्त आहेत. शाळेच्या जाण्याच्या काळात मुले घरी असल्याने मोलमजुरी कशी करावी, असा प्रश्‍न आता पालकांना सतावत आहे.

ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे आता पालकांची डोकेदुखी वाढली आहे. अलीकडे शाळेच्या पहिल्या दिवसाचा ‘इव्हेंट’ जल्लोषात साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. यंदा ‘कोरोना’ने विद्यार्थी व शिक्षकांच्या या उत्साहावर विरजण घातले. शासकीय निर्देशानुसार १५ जून रोजी शाळांची घंटा वाजली खरी; परंतु मुलेच नसल्याने शाळांच्या रम्य वातावरणातील चैतन्य हरविल्याचा प्रथम प्रत्यय आला आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शाळांची काळजी मुख्याध्यापक, शिक्षक वाहणार असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रोटोकॉलनुसार सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, सॅनिटायझर आदी व्यवस्था करण्यासाठी शिक्षकांची धावपळ बघायला मिळाली.

हे देखील वाचाच - कोरोना इफेक्ट : चार फुटापेक्षा उंच केलेल्या गणेश मुर्तीचा खर्च पाण्यात

कसा करणार मुलांचा सांभाळ?
दुसरीकडे पालकांचा मनःस्ताप वाढत आहे. ग्रामीण भागात सध्या शेतकामाचा मौसम आहे. मुले शाळांत गेली की आई-वडील बिनधास्त मोलमजुरी करून उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडवीत असत. परंतु, यंदा त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात फारसे कामे नसल्याने आई-वडिलांनी संपूर्ण उन्हाळा घरीच बसून काढला. त्यादरम्यान लॉकडाउनही होता. त्यामुळे मजुरीवर जाण्याची वेळच आली नाही. मात्र, आता शेतातील कामे सुरु झालीत. मात्र शाळा बंद असल्याने लहान मुलांचा सांभाळ करणार कोण? असा प्रश्‍न पालकांसमोर आहे.

येथे क्लिक कराच - रक्षाबंधनानिमित्त : आमदार हंबर्डे यांनी घेतली कोवीड सेंटरमधील महिला रुग्णांची भेट

शिक्षकही झाले निराश
शाळांमध्ये विद्यार्थीच न आल्यामुळे शिक्षकही निराश झाले आहेत. त्यांच्यावरही मानसिक परिणाम झाला आहे. शाळांच्या आवारात मुलांची वाट पाहत असल्याचे स्पष्ट जाणवत आहेत. कोरोनाचा मोठा फटका शैक्षणिक विश्‍ला बसला आहे. विद्यार्थी शाळेत येण्यास प्रचंड उत्सुक असताना विद्यार्थ्यांना मात्र मनाई आहे. त्यामुळे सध्या शाळेमध्ये केवळ शिक्षकांचीच उपस्थिती बघायला मिळत आहे.

पालकांचा प्रश्‍न शासनाने सोडवावा
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्याचा थेट परिणाम पालकांच्या मोलमजुरीवर झाला आहे. शासनाने मुलांच्या देखभालीसंदर्भात योग्य निर्णय घ्यावा. सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. तर मजुरांसमोरही मुलांच्या देखभालीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने योग्य तो निर्णय घ्यावा, मुलांचे शिक्षण मोफत करावे, कोणतीही फी आकारू नये, अशी मागणी कामगार व शेतकरी नेते रावसाहेब घुगे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Causes Parental Headaches Nanded News