दुबार पेरणीची वेळ आली तर काय कराल......वाचा सविस्तर

file photo
file photo

नांदेड : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचा कृषि विभाग आणि परभणी येथील वसंतराव नाइक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची उगवण कमी झाल्यामुळे पुढील पिकाबाबत काय काळजी घ्यावी, बाबत आवाहन केले आहे. दुबार पेरणीची शक्यता काही ठिकाणी व्यक्त होत आहे. अशावेळी काय करावे याबाबत कृषी शास्त्रज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. 

दुबार पेरणीसाठी काय काळजी घ्यावी
चालू हंगामामध्ये मान्सूनपूर्व व मॉन्सूनचा पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. परंतु पेरणीनंतर पावसाचा खंड, जोराचा पाऊस अथवा बियाण्याची उगवणक्षमता यामुळे काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीकाची उगवण कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. या परीस्थितीमध्ये दुबार पेरणी करावयाची झाल्यास यापुढे कोणते पिक घ्यावे आणि त्याची पेरणी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हे पाहणे आवश्यक ठरते.

पर्यायी पीके
सोयाबीन पीकाची उगवण कमी झाल्यामुळे त्या जमिनी मध्ये दुबार पेरणी करायची झाल्यास त्याठिकाणी सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, भुईमुग, मुग, उडीद व सुर्यफुल त्याच प्रमाणे या पीकांवर आधारीत आंतरपीक पद्धतीने या पिकांची पेरणी करता येईल. या पीकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या वाणांची निवड करावी.

दुबार पेरणीसाठी वाणांची निवड
तूर - बीडीएन ७११, बीडीएन ७१६, बीएसएमआर ७३६
मुग- बीएम २००३-२, बीएम २००२-१, बीएस १४५, बीएम ४ उडीद - टीएयु १, बीडीयु १, 
ज्वारी - परभणी शक्ती, पीव्हीके ८०९, परभणी श्वेता, सीएसव्ही १५, सीएसएच १६, सीएसएच २५
सोयाबीन - एमएयुएस ६१२, एमएयुएस १६२, एमएयुएस १५८, एमएयुएस ७१, जेएस ३३५,
कापूस - एनएचएच ४४ बीटी व अन्य वाण

आंतरपीक पद्धती
निखळ पीक घेण्यापेक्षा उत्पादनामध्ये हवामानातील बदलानुरूप स्थैर्य राहण्यासाठी शेतक-यांनी खालीलप्रमाणे आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा.
प्रमुख पीक      आंतरपीक पद्धती
कापूस     -    कापूस+मुग (१:१), कापूस+मुग (१:२), कापूस+उडीद (१:१), कापूस+सोयाबीन (१:१), कापूस+तूर (६:१) किंवा (१०:२)
सोयाबीन -    सोयाबीन+तूर (४:२/४:१/५:२)
तूर-         तूर+मुग 
ज्वार-         ज्वारी+तूर (३:३/४:२)

दुबार पेरणी करतांना घ्यावयाची काळजी
• सध्या खरीप पीकांची पेरणीची वेळ संपली नाही. त्यामुळे सर्व खरीप पीकांची पेरणी करता येईल.
• ता. ७ जुलै पर्यंत पेरणी करतांना लागवड पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.
• पेरणी करतांना पीकास अनुरूप बीजप्रक्रिया अवश्य करावी. यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थायरम किंवा कार्बेन्डॅझिम ३ ग्रॅम प्रती किग्र बियाणे याप्रमाणात बियाण्यास चोळावे. तसेच डाळबर्गीये पीकांकरीता रायझोबीयम व पीएसबी या जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया २५ ग्रॅम पावडर किंवा १० मिली द्रवरूप संवर्धक प्रती किग्रा बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. • ज्या शेतक-यांनी सोयाबीन+तूर या अंतर पीक पद्धतीने ४:१ / ४:२ प्रमाणात पेरणी केली व त्यामध्ये तुरीची उगवण समाधानकारक असून सोयाबीनची उगवण कमी असल्यास पूर्ण जमिनीवरील पीक न मोडता केवळ सोयाबीनची बैलचलीत तिफणी द्वारे पेरणी करावी अथवा सोयाबीनचा ओळी ऐवजी तुरीची एक ओळ टोकण करावी. • यापूर्वी सोयाबीन पिकास रासायनिक खतांची मात्रा दिलेली असल्यास त्या ठिकाणी पुन्हा सोयाबीन पेरतांना खतांची मात्रा देण्याची आवश्यकता नाही. सोयाबीन ऐवजी दुस-या पिकाची पेरणी करावयाची असल्यास पूर्वी दिलेल्या खतांची मात्रा विचारात घेऊन नवीन पिकासाठी खताची मात्रा द्यावी.
• सोयाबीन पीकाची पेरणी करावयाची असल्यास आणि त्याचे बियाणे बाजारातून घेतल्यास अथवा उपलब्ध न झाल्यास घरचे सोयाबीन उगवणक्षमता तपासून वापरता येईल. त्यासाठी उगवणक्षमता तपासणी करीता उपलब्ध सोयाबीन मधील १०० दाने मोजून मातीमध्ये अथवा ओल्या पोत्यावर ओळींवर ठेवून ते झाकावे अथवा पोते गुंडाळून ठेवावे. एक आठवड्यापर्यंत माती/पोते ओलसर ठेवावे. एका आठवड्यानंतर सदरील बियाणे काढून उगवण झालेल्या बियाण्याची संख्या मोजावी व उगवणक्षमता टक्केवारी ठरवावी. उगवण क्षमता किमान ७०% असणे आवश्यक आहे. तथापी सद्यस्थिती मध्ये बियाणे उपलब्धता कमी असल्यामुळे ६०% उगवणक्षमता असणारे बियाणे वापरता येईल. तथापी कमी उगवणीच्या तुलनेत बियाण्याचे प्रती एकरी प्रमाण खालील प्रमाणे वाढवावे.


बियाण्याची उगवण क्षमता        बियाण्याचे प्रती एकरी प्रमाण
७०%                    ३० किग्रा
६५%                    ३२.५ किग्रा
६०%                    ३५ किग्रा

उगवणी पूर्व तणनाशकाची फवारणी केली असल्यास
यापूर्वी सोयाबीनची पेरणी करून व त्या जमीनीवर दुबार पेरणी करावयाची झाल्यास त्या जमिनीवर उगवणीपुर्व तणनाशकाची फवारणी केली असल्यास पुढील पीक निवडण्यावर मर्यादा येतील. सर्वसाधारणपणे शेतक-यांनी पेंडीमिथॅलीन किंवा डायक्लोसुलाम या तणनाशकांचा वापर केला आहे असे आढळते. या परिस्थितीमध्ये या तणनाशकाचा वापर झालेल्या जमिनीवर दुबार पेरणी करतांना पुढील पीके निवडता येतील. पेंडीमिथॅलीन (स्टाम्प/टाटापानिडा/ पेंडॉल/पेंडीहर्ब - मुग, उडीद, कापूस, तूर, साळ, सोयाबीन डायक्लोसुलाम (स्ट्राँगआर्म/दबोच) - सोयाबीन व भुईमुग. सोयाबीनची उगवण कमी झाल्यामुळे किंवा उगवणच न झाल्यामुळे त्याचे क्षेत्र तसेच नापेर न ठेवता वरीलप्रमाणे पीकांची पेरणी करावी. साधारणत: १५ ते २० जुलै पर्यंत पेरणी करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com