जेंव्हा जिल्ह्यातील 15 मुक- कर्णबधिरांना बोलता व ऐकता यायला लागते तेंव्हा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुक बधीर

जेंव्हा जिल्ह्यातील 15 मुक- कर्णबधिरांना बोलता व ऐकता यायला लागते तेंव्हा...

नांदेड : आजचा काळ हा कोरोनाच्या दृष्टिने शासकीय आरोग्य विभागासाठी अत्यंत आव्हानात्मक जरी असला तरी नागरिकांच्या इतर आजारांकडे शासनाला दुर्लक्ष करता येत नाही. ग्रामीण भागातील माता बाल स्वास्थ्य कार्यक्रम असेल, क्षयरोग निर्मुलन अभियान असेल, कुष्ठरोग निवारण अभियान या साऱ्या नागरिकांच्या आरोग्य विषयक विविध उपक्रमांची जबाबदारी आरोग्य विभागातर्फे अत्यंत समर्थपणे सुरु आहे. यातील अशाच एका महत्वाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 15 मुक कर्णबधिरांची निवड करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया व बोलता येण्यासाठी स्पीच थेरपीचा उपचार करुन त्यांना बोलता येण्यासह ऐकण्याच्या दृष्टिनेही समर्थ केले.

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य पथकामार्फत तपासणी केली जाते. या तपासणीतून गंभीर आजार असल्यास अथवा कुण्या बालकांमध्ये व्यंग असल्यास त्याचेही मोफत उपचार व शस्त्रक्रीया केल्या जातात. या उपक्रमातंर्गत वैद्यकीय पथकाकडून शोध घेतलेल्या 90 मुक कर्णबधीर बालकांची तपासणी व उपचाराबाबत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा - पुयनी बु. येथे वीज पडून एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. दोन) एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

सदर शिबिरात कान नाक घसा तज्ञ डॉ.सुधीर कदम व त्यांची टिम कडून तपासणी करून त्यामधून 30 बालकांची बेरा तपासणी केली असता 15 बालकांना कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रीया करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे निष्पण झाले होते. या 15 बालकांचे कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रीया करण्यापूर्वी CT, MRI, ECG, 2D Echo आणि रक्ताच्या सर्व चाचण्या ह्या ग्रामिण/उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय येथे मोफत करण्यात आल्या. या 15 बालकांमध्ये नांदेडमधील दोन, नायगावमधील चार, लोहा दोन, कंधार एक, किनवट दोन, भोकर एक, हिमायतनगर दोन, उमरी एक या बालकांचा समावेश आहे. शस्त्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या 78 लक्ष रुपये खर्चाची तरतुद आवश्यक होती. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे सदरील अनुदान उपलब्ध नव्हते.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी आरोग्य कुटूंब कल्याण कार्यालय पुणे येथे पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतले.

या सर्व बालकांच्या शस्त्रक्रीया करण्यासाठी सामजस्य करार करण्यात आलेल्या यशश्री ENTहॉस्पिटल मिरज- सांगली येथे या 15 बालकांची अत्यंत गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली. सदर शस्त्रक्रीया पार पाडण्यासाठी 78 लक्ष रुपये खर्च शासनाने केला. त्या बालकांचे बहिरेपण दूर झाले असुन पालकांनी निशुल्क वैद्यकीय सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हयातील कार्यरत राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, वैद्यकीय आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व ANM यांनी सध्याच्या करोना महामारी काळात सुद्धा बालकांच्या पालकांचे यशस्वी समुपदेशन करुन शस्त्रक्रीया केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

Web Title: When 15 Deaf And Dumb People In The District Can Speak And

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top