जेव्हा जिल्हाधिकारी करतात घोड्यावरून स्वारी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शुक्रवारी (ता. २६) सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेस सदिच्छा भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी सैनिकी विद्यालय परिसरात विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांनी दोन एकर जागेत उभारलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स पार्कमधील विविध वैज्ञानिक उपकरणांची पाहणी करून माहिती घेतली. या वेळी पार्कमध्ये त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सगरोळी, (ता.बिलोली, जि. नांदेड) ः सकाळी नांदेड येथील कार्यालयातील बैठक, प्रवास व वाळू घाटांची पाहणी करून संस्था संकुलात आल्यानंतर जिल्हाधिकारी थकले असतील, फारसा वेळ देणार नाहीत असे वाटले. परंतु, सैनिकी विद्यालयातील अश्वशाळा व तेथील आकर्षक घोडे पाहिल्यानंतर त्यांना घोडेस्वारीचा मोह आवरला नाही. सुमारे तीन तास संस्थेतील विविध प्रकल्प पाहिल्यानंतरही त्यांनी आवर्जून येथील सनराईज मैदानावर घोडेस्वार होऊन आनंद लुटला.

विविध प्रकल्पांची पाहणी
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शुक्रवारी (ता. २६) सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेस सदिच्छा भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी सैनिकी विद्यालय परिसरात विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांनी दोन एकर जागेत उभारलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स पार्कमधील विविध वैज्ञानिक उपकरणांची पाहणी करून माहिती घेतली. या वेळी पार्कमध्ये त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील दोघांनी का कवटाळले मृत्यूला...? -

 

भूषणावह असल्याचे गौरवोद्गार
(ता.१५) जूनपासून संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. योगायोगाने या वेळी वर्ग चालू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वर्गात प्रवेश केला व अवलोकन करून शिक्षकांशी संवाद साधला. क्रीडा क्षेत्रात विशेष रुची असल्याने येथील जलतरणिकेची पाहणी करून तेथील प्रशिक्षक व व्यवस्थापकांशी चर्चा करून समाधान व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्रातील जैविक प्रयोगशाळा, माती व पाणी प्रशिक्षण प्रयोगशाळा, उत्कर्ष प्रक्रिया केंद्र, शेळीपालन, कुक्कुटपालन, बीज प्रक्रिया केंद्र, लिंबोळी प्रक्रिया, हातमाग, गोशाळा, दूध संकलन केंद्र, विविध पीक प्रात्याक्षिकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. मागील ६० वर्षांत संस्थेस प्राप्त विविध पुरस्कारांचे अवलोकन केले. या वेळी त्यांनी संस्थेचे कार्य जिल्ह्यातच नव्हे तर राज्यासाठी हे एक प्रशिक्षण केंद्र असून आपल्या सर्वांसाठी हे भूषणावह असल्याचे गौरवोद्गार काढले.

 

या वेळी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, सचिव डॉ. जयंत जकाते, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार विक्रम राजपूत, सुनील देशमुख, सरपंच प्रतिनिधी व्यंकट सिद्नोड, उपसरपंच रोहित देशमुख, नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश कुलकर्णी, मांजरा बचाव कृती समितीचे अध्यक्ष गंगाधर प्रचंड, ग्रामसेवक श्रीनिवास मुगावे, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, संस्था कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When The Collector Rides A Horse, Nanded News