
नांदेड - नांदेड शहरामधून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नदीकाठाहून जाणाऱ्या महापालिकेच्या १८ नाल्यांपैकी काही नाल्यांची ड्रेनेज लाईन फुटुन त्यातील घाण पाणी नदीत मिसळत असल्यामुळे प्रदूषण वाढले आहे. गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले तसेच निधीसाठीही केंद्र व राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली. मात्र, अजूनही गोदावरीच्या शुद्धीकरणाचा मुहूर्त लागला नाही.
नांदेड शहरामधून गोदावरी नदी वाहते. या नदीवर उर्वशी घाट, गोवर्धन घाट, नगीना घाट, शनी मंदिर घाट पासून ते नावघाट पर्यंत तसेच कौठा, नवीन पूल, जुना पुल आदी घाट आहेत. वरील बाजूस विष्णुपुरी प्रकल्प आहे तर खालील बाजूला देगलूर नाका वाजेगाव येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून गोदावरी नदीचे हे पात्र प्रदूषित झाले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मासे मेल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे.
सांडपाण्याचा प्रकल्प नावालाच
नांदेड शहरातील वेगवेगळ्या भागातून जे नाले वाहतात. त्यापैकी १८ नाले हे गोदावरीला मिळतात. त्यामुळे या नाल्यांना एकत्र करुन या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या १३ कोटींच्या निधीतून १९९९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे गोदावरी जलशुद्धीकरण प्रकल्प बनविण्यात आला. त्यासाठी बोंढार येथे ११० एकर जागेवर मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. नाल्यातून वाहत येणारे पाणी देगलूर नाका येथील पंपगृहापर्यंत आणणे व तेथून बोंढारला नेऊन ते पाणी शुद्ध करुन पुन्हा नदीत सोडण्याची योजना होती. या योजनेला जवळपास २००८ उजाडले. मात्र, योजना पूर्ण झाली तरी ती सुरु झाली नाही की त्याकडे कुणी पाहिले नाही.
२०१७ मध्ये पुन्हा योजनेवर खर्च
२००८ ते २०१७ या दरम्यान या योजनेकडे लक्ष गेले नाही. पुन्हा हा विषय चर्चेला आल्यानंतर महापालिकेने त्यासाठी ५५ लाख रुपये खर्चून ही योजना कार्यान्वित केली. नाल्याचे मिसळणारे पाणी बोंढारच्या शुद्धीकरण केंद्रापर्यंत नेण्यात आले. मात्र, हा प्रकल्प जेमतेम सहा महिने चालला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. त्यानंतर पुन्हा या योजनेचे पाणी परळीच्या औष्णिक केंद्राला देण्याचाही विचार आणि प्रस्ताव आला होता. मात्र, तोही नंतर रेंगाळला.
हेही वाचलेच पाहिजे - दोन दुचाकीवरून चार जण आले अन् एसटी बस...
पुन्हा प्रस्ताव शासनाकडे सादर
२०१८ मध्ये पुन्हा एकदा गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी महापालिकेच्या वतीने तत्कालीन प्रभारी आयुक्त लहुराज माळी, अशोक काकडे यांच्यामार्फत राज्य सरकारकडे गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठीचा २८ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) पाठविण्यात आला. राज्य शासनाने पुन्हा महापालिकेला पाठवला आणि त्यात बदल करुन हा प्रस्ताव ७७ कोटींचा करण्यात आला आणि पुन्हा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. तो मंजूर करण्यात आला आणि पहिल्या टप्प्याचे १७ कोटी मंजूर करण्यात आले. आता त्यातून चुनाल नाला या भागात मलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचा प्रस्तावही मंजूर झाला आहे मात्र अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. त्यामुळे आता गोदावरीच्या जलशुद्धीकरण मोहिमेला कधी मुहूर्त लागणार? याकडे लक्ष लागले आहे.
सामुहिक प्रयत्नांची गरज
गोदावरीच्या नदीचा काठ गुरुता गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने कोट्यावधी रुपये खर्चून अतिशय सुंदर करण्यात आला आहे. नांदेडचे हे सौंदर्य जपण्यासाठी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी एकत्र येत जपण्याची गरज आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळासह इतर संबंधित विभागाने देखील सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे. गोदावरी शुद्धीकरणाची मोहिम मध्यंतरी पर्यावरणप्रेमी संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन राबविली होती. त्यास नांदेडकरांचाही प्रतिसाद मिळाला होता. नदीतील जलपर्णी काढण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सामुहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.