कुठे चाललाय समाज : वंशाला दिवा पाहिजे म्हणून विवाहितेचा छळ 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 12 September 2020

पती प्रतिक याने कार व घर घेण्यासाठी तुझ्या वडिलाकडून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला त्रास देत असे. दरम्यानच्या काळात या दाम्पत्याला कन्या रत्न जन्माला आले. 

नांदेड : कार व घर घेण्यासाठी माहेराहून पाच लाखाची मागणी करून एका विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहराच्या सरपंचनगर (तरोडा खु.) येथील स्नेहल हिचे लग्न भांबराज (जिल्हा यवतमाळ) येथील प्रतिक मिटकरी याच्यासोबत रितिरिवाजानुसार झाले होते. लग्नानंतर स्नेहल सासरी व त्यानंतर पतीसोबत नागपूर येथे हुंडकेश्‍वरनगर भागात राहात होती. तिला सासरी काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर मात्र तिचा किरकोळ कारणावरुन छळ करणे सुरु केले. पती प्रतिक याने कार व घर घेण्यासाठी तुझ्या वडिलाकडून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला त्रास देत असे. दरम्यानच्या काळात या दाम्पत्याला कन्या रत्न जन्माला आले. 

हेही वाचा केळीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी शेतीशाळेचा लाभ घ्यावा- अनिल शिरफुले -

वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे

यानंतर ता. एक नोव्हेंबर २०१२ ते ता. २० मार्च २०२० या काळात तर तिचा अधिकच त्रास सुरु झाला. सासु संध्या व दीर स्वदीप मिटकरी यांनी यात भाग घेऊन तुला मुलगी झाली. आम्हाला वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे होता. तु काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही असे म्हणून तिचा मानसिक व शारिरीक छळ करुन तिला उपाशी पोटी ठेवत. सासरी होणारा त्रास तिने आपल्या माहेरी सांगितला. माहेरच्यांनीही त्यांना समजावून सांगितले. मात्र त्यांच्या वागण्यात काही बदल झाला नाही. शेवटी तीने आपले माहेर गाठले. त्यानंतरही तिचा त्रास काही केल्या कमी होत नव्हता.

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

आपला संसार सुरळीत व्हावा यासाठी तीने पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात तक्रार दिली. या ठिकाणीही तिला सासरच्याकडून न्याय मिळाला नाही. शेवटी महिला सहाय्य कक्षाच्या पत्रानुसार तिच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात पती प्रतिक मिटकरी, सासु संध्या मिटकरी आणि दीर स्वदीप मिटकरी यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. शिरसाट करत आहेत. 

येथे क्लिक करानांदेड : मी वृक्षमित्र स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके -

दुसऱ्या विवाहितेचा सराफा दुकानासाठी छळ

नांदेड - इतवारामध्ये अशाच एका दुसऱ्या घटनेत प्रियंका राजूरकर (वय २७) हिला सराफा दुकानासाठी माहेराहून पाच लाखाची मागमी करुन सासरच्या मंडळीनी त्रास देणे सुरु केले. सन डिसेंबर २०१४ ते ता. २५ जून २०२० पर्यंत तिला त्रास देणे सुरुच ठेवले. अखेर या त्रासाला कंटाळून प्रियंका राजूरकर यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात पती प्रभू राजूरकर, बालाजी राजूरकर आणि दीर सागर राजूरकर यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. निरडे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where is the society going daughter in law tortuer nanded news