कोण म्हणतंय समाजातली माणूसकी आटलीय !

Nanded News
Nanded News

नांदेड : कोण म्हणतंय समाजाच्या संवेदना बोथट झाल्या, कोण म्हणतंय समाजातली माणूसकी आटलीय? एका आदिवासी महिलेला जीवदान देणा-या डॉ. बेलखोडे यांचे कोरोना काळातील हे अतुलनीय कार्य निश्र्चितच प्रशंसनीय आहे. त्यांच्या फेसबूक पोस्टवरील मजकूर जसाच्या तसा खास ‘ईसकाळ’च्या वाचकांसाठी देत आहोत.  

अडीच वर्षे रक्तस्त्राव व हिमोग्लोबीन २.४ ग्रॅम
साधारण १५ दिवसांपूर्वी एका बाईला तिच्या दोन तरूण मुलींनी दवाखान्यात आणले. बाईला चालणेही मुश्कील होते, चालले की खूप दम लागायचा म्हणून मुलींनी दोन्ही बाजुंनी आधार देत तिला आणून पलंगावर झोपविले. मी तपासले, दम लागते म्हटल्यावर कोरोना मनात डोकावला, हृदयविकारही असू शकतो असेही वाटले. पण पांढरा फटक व निस्तेज चेहऱ्याकडे पाहिल्यावर अंगात रक्त कमी असावे असे प्रकर्षाने जाणवले. म्हणून शरीराच्या कोणत्या भागातून रक्त जाते का? असे विचारले; त्यांचे उत्तर ऐकूण मात्र धक्का बसला. 

मागील अडीच वर्षापासून अनियमीत पाळी व सारखा खूप कपडा तिला जात होता. तपासणी अंती पोटावरूनच चार ते पाच महिण्याची गरोदर असावी असे दिसत होते. पण वय वर्ष ५२-५३ मनातून शक्यता फेटाळली व शरीरात रक्तही कमी म्हणून आतून तपासणी केली. गर्भाशयात मोठी गाठ असल्यामुळे ते मोठे झाले आहे (फायब्रॉईड)असे निदान केले. रक्तस्त्राव सुरूच होता, पण कमी प्रमाणात. ताबडतोब रक्त तपासणी करून घेतली आणि तिचे हिमोग्लोबीन २.४ ग्रॅम भरले.
  
चळवळीत वाढलो असल्याने 
‘ये भारत की नारी है-फुल नही चिंगारी है’ असा बेंबीच्या देठापासून नारे देणारा मी मनातुन ओशाळलो. किती सहन करावे त्या माऊलीने व किती दुर्लक्ष करावे सरकारने, आरोग्य यंत्रणेने, समाजाने, घरातील मंडळीने व स्वत: तिने असंख्य प्रश्नांचे काहूर मनात दाटून आले. सोनोग्राफी करून घेतली. गर्भाशयाचा आकार वाढलेला व आत ४ से.मी. व्यासाची गाठ. हिला बरे करूनच पाठवायचे असे मनोमन ठरविले. सोबतच्या तिच्या मुली व नातेवाईकांशी बोलू लागलो. ‘नवरा नाही, आम्ही आदिवासी, आम्ही खूप गरीब आहोत इथपासून तर ऑपरेशन कसं करणार इथपर्यंत सर्व बाबी, कारणे म्हणून  पुढे करीत आता आम्हाला जाऊ द्या’  पुन्हा पाहूत असा धोशा त्या सर्वांनी लावला. 

मी मात्र विविध प्रकारे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होतो. आम्ही दोघेही वस्तुस्थितीला धरून बोलत होतो, फरक एवढाच होता. मी मार्ग सांगत होतो ते अडचणी सांगत होते. शेवटी तुम्हीच मार्ग काढावा. नाही तर तेरवीसाठी लागणारा खर्च करावाच लागेल ते तर टाळता येणार नाही असा निर्वाणीचा इशारा देऊन किल्ला लढवित मी जिंकलो. तिला भरती करुन घेतले. दोन दिवस रक्त वाढीचे इंजेक्शन दिले. स्वत:चे स्वत: चालू लागली. चार दिवस घरी जाण्याची परवानगी दिली. तयारीने यायला सांगितले चार पाच दिवसात ती थोडीफार तयारी करून आलीही. पुन्हा भरती करुन घेतले. मीही सढळ हाताने कंसेशन द्यायचे ठरविले. काही तरूणांना कामाला लावले. तीन चार बॉटल रक्त आणल्या गेले. हिमोग्लोबीन २.४ वरून ४ ग्रॅम, ५.५ ग्रॅम, ८.५ ग्रॅम, ९.८ ग्रॅम असे वाढू लागले. वाढले.

त्यानंतर तिचे गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन केले. गर्भाशयातील मोठ्या गाठीसह गर्भाशय काढून टाकले. हे ऑपरेशन करतांना व केल्यानंतर एका अत्यंत गरीब, आदिवासी, दुर्लक्षीत, गरजू महिलेला आपल्या ज्ञान व कौशल्याचा उपयोग करून तिला मदत केल्याचा स्वानंद व अनुभूती मी अनुभवत होतो. त्या बाईचा अंगावरून वारंवार सातत्याने रक्त जाण्याचा प्रवास मी थांबविला. कटकट थांबली. खूप कृतकृत्य वाटले दवाखान्यातील व ऑपरेशनच्या वेळी असणारे सहकारी डॉक्टर व कर्मचारी यांच्यासमोर ही भावना व्यक्त केल्यावाचून रहावले नाही.  

तिच्या चेहऱ्यावरील आनंद प्रेरणादायी
या बाईला प्रकृतीची विचारपूस करतांना तिच्या चेहऱ्यावरील समाधान व हास्य मला खूप आत्मीक समाधान व प्रेरणा देत होते. तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेऊन मी तिचे मनापासून आभार मानले. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल व मला हा स्वानंद व समाधान मिळू दिल्याबद्दल. माझे ऐकल्याबद्दल. किनवटच्या मागील २६ वर्षाच्या वास्तव्यात साने गुरूजी रूग्णालयातील अगदी असेच समाधान देणारे अनेक प्रसंग चित्रफिती सारखे डोळ्यापुढे येऊन गेलेत. 
- डॉ. अशोक बेलखोडे, किनवट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com