का कवटाळले तिने मृत्यूला...? वाचा सविस्तर

file photo
file photo

नांदेड : सासरी होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने शेताजवळील एका खदानीतील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना खैरगाव तांडा (ता. हिमायतनगर) शिवारात शनिवारी (ता. सहा) घडली. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासु व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

माहूर तालुक्यातील रुपला नाईक तांडा येथील सुदाम थावरा पवार (वय ४०) यांची मुलगी पूजा (वय २०) हिचे लग्न खैरगाव तांडा (ता. हिमायतनगर) येथील विकास देवराव राठोडसोबत झाले होते. लग्नानंतर तिला सासरी काही दिवस चांगले नांदवले. दरम्यानच्या काळात पूजा हिला दोन लाखाची मागणी करून त्रास देणे सुरू केले. पती विकास राठोड हा तिला वेळप्रसंगी मारहाण करत असे. एवढेच नाही तर तिला उपाशी ठेवत असत.

दोन लाखासाठी छळ

माहेराहून जोपर्यंत दोन लाख रुपये आणत नाहीस तोपर्यंत तुला सुखाने नांदू देणार नाही. यातूनच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरी होणार त्रास तिने आपल्या माहेरी सांगितला होता. माहेरची परिस्थिती दोन लाख रुपये देण्याची नव्हती. त्यामुळे काही दिवस त्रास सहन करणे आवश्‍यकच असल्याने ती सासरी राहू लागली. मात्र सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तिने खैरगाव तांडा शिवारात आपल्या शेतालगत असलेल्या एका खदाणीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. 

हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

घडलेल्या घटनेची माहिती तिच्या माहेरी लागताच माहेरच्या मंडळीनी तिचे सासर गाठले. माझ्या मुलीने पती, सासू व सासरा यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार हिमायतनगर पोलिस ठाण्यात सुदाम पवार यांनी दिली. त्यांच्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात विकास राठोड, सासरा देवराव राठोड आणि सासू शांताबई राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. महाजन करीत आहेत. 

चोरट्या वाहतुकीसाठी वाळू माफियांची नवीन युक्ती

वाई बाजार (ता. माहूर) : सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरा शिवारात शुक्रवारी (ता. पाच) रात्री अडीच वाजताच्या सुमारास चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणारे टिप्पर वाई बाजारचे मंडळ अधिकारी टी. आर. सुगावे यांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले व सिंदखेड पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला. वाळूची चोरटी विनारॉयल्टी बेकायदेशीररीत्या वाहतूक निष्पन्न झाल्यानंतर तहसील कार्यालयाकडून तातडीने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे होते. परंतु, दोन दिवस लोटले तरी अशा कोणत्याही स्वरूपाची दंडात्मक कार्यवाही तहसील कार्यालयाकडून वाहन मालकावर करण्यात आलेली नाही.

माहूर तालुक्यातील वाळूचा गोरखधंदा

लॉकडाउन दरम्यान महसूल व पोलिस यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधत वाळू तस्कर पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची बेकायदेशीररीत्या उपसा करून वारेमाप दराने विक्री करत आहेत. माहूर तालुक्यातील वाळूचा गोरखधंदा दिवसेंदिवस निरंकुश बनत असल्याने जिल्हा प्रशासनाने या करिता स्वतंत्र आस्थापना निर्माण करून कार्यवाही करण्याची गरज येऊन ठेपली आहे. (ता. पाच) जून रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास उमरा शिवारात विनारॉयल्टी बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे मंडळ अधिकारी टी. आर. सुगावे यांच्या निदर्शनास आल्याने वाळूची चोरटी वाहतूक करणारा टाटा कंपनीचा नऊ एक्स मॉडेल असलेला टिप्पर (एमएच २६ - बीई ६३४७) मोठ्या शिताफीने पकडून दीड ब्रास वाळूसह ताब्यात घेतले व सिंदखेड पोलिस ठाण्यात जमा केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com