का असते ज्ञानाची आवश्‍यकता? वाचाच तुम्ही

File photo
File photo

नांदेड : सद्यस्थितीत वैज्ञानिक कसोटीवर टिकणारे ज्ञान सातत्याने निर्माण होणे गरजेचे आहे. या ज्ञानामुळेच असंख्य शोध लागले असून मानव जातीचे जीवन सुखकर झाले आहे. या ज्ञाननिर्मितीमुळेच  अंधश्रद्धा आणि अज्ञानाला दूर करणे शक्य होऊ शकते. आज अंधश्रध्दा आणि अज्ञान हेच विकासातील मोठे अडथळे आहेत.

मनुष्य सकारात्मक झाला पाहिजे
कोरोना देवाच्या कृपेने जाईल हे अज्ञान, अंधश्रद्धा असून वैद्यकीय शोध, लसीमुळे जाणार हे ज्ञान होय. लसीचा शोध वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञानामुळे लागत आहे. परंतु, ज्ञानी माणसांना, वैज्ञानिकांना विरोध करून मानव जातीची अपरिमित हानी केली आहे. असे आता तरी होऊ नये यासाठी कृतिशील विचारवंत, ज्ञानावंतांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, परिवर्तनवादी विचार रूजविण्यासाठी समोर येण्याची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोन, विचार आणि भावना निर्माण करणा-या ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी मनुष्य सकारात्मक झाला पाहिजे.  

ज्ञानाच्या प्रसारासाठी परिश्रमाची गरज 
विहीर खोदूनच थांबलो अन् त्या विहीरीतील पाणी उपलब्ध करून दिले नाही तर पीक हाती येत नाही.  ज्ञानालाही हा नियम लागू आहे. ज्ञान निर्मिती करून थांबता कामा नये; तर त्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचारासाठीही परिश्रम घेतले पाहिजेत. कामाला सन्मान जसा मिळतो तशा टीकाही होतात.  ज्ञानाची, सिध्दीची प्रसिध्दी झाली तरच लोकांना त्या सिध्दीचा, ज्ञानाचा उपयोग करून घेता येईल. धन निर्माण करायचे, पण ते बाहेर येऊच दिले नाही तर, त्या धनाचा काय उपयोग?

...तरच जग सुखाने नांदेल
अज्ञान दूर करण्यासाठी  तर ज्ञानाची आवश्यकता असतेच; पण अडचणी, समस्या, संकट, ताणतणाव, अपयश, दुःख यावर मात करण्यासाठीदेखील ज्ञानाची आणि ज्ञानी माणसांची आवश्यकता असते. प्रचलित ज्ञान पुरेसे नसेल तर नव्या ज्ञाननिर्मितीची तजवीज करावी लागते. यासाठी प्रतिभावंतांनी ज्ञान निर्मितीसाठी नित्य सज्ज राहिले पाहिजे. आज कोरोनाने जग परेशान आहे, त्याला घालवण्यासाठी उपयुक्त ज्ञान, तंत्रज्ञान पुढे आले अन्  त्याचा उपयोग केला तरच जगाला सुखाने जगता येईल.

ज्ञानी व ज्ञानच आहे विकासाचा गाभा
जिथे अज्ञानाची पूजा होते आणि ज्ञान आणि ज्ञानी माणसांची कुचंबणा, उपेक्षा, अवहेलना, कुचेष्टा, निंदा, नालस्ती, दुर्लक्ष, विटंबना आणि हत्त्या होतात, तिथे विकासाची प्रक्रिया गतिमान होऊ शकत नाही.
ज्ञानी आणि ज्ञान हा विकासाचा गाभा आहे. नवं ज्ञान, नवा दृष्टिकोन समाजाला देऊ पाहणारा माणूस परंपरा, रूढी, प्रथा, आमच्या धर्म श्रद्धाची चिकित्सा करत असतो. उपयुक्त, विकासाभिमुख काय आहे, याची जाणीव करून देत असतो. 

सतत कार्यशील राहावे
ध्येयवादी माणसं सतत कार्यशील राहतात. जसे पिंज-याची सवय लागलेल्या पोपटांना आकाश विहार नको वाटतो, तसे  अज्ञानालाच चिटकून बसण्यात आपलं हित आहे, हा गैरसमज झालेली माणसं नव्या बदलाला स्वीकारण्यासाठी तयार होतं नाहीत. हे जिथं जिथं  जिथं घडते तिथं तिथं मंगल घडत नाही, दंगलीची शक्यता अधिक असते. मग नवं निर्माण घडवून आणण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करत वाटचाल करावी लागते. 

बुद्धिवंतांनी ज्ञान निर्मितीचे कार्य केले पाहिजे
अज्ञानाला विजय करण्यासाठी स्पर्धा लागली असेल तर ज्ञान रक्तबंबाळ होत राहील. विकासाची प्रक्रिया गतिमान होऊ शकणार नाही, यासाठी सर्वांनी ज्ञानाला पाठबळ देण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.शेतकरी धान्य निर्माण करतो,ते बाजारात आणतो तसं बुद्धीवंतांनी ज्ञान निर्मिती आणि ज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी काम केले पाहिजे.
- डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com