पत्नीचा खून : पतीसह दोघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

घटना मुखेड तालुक्यातील सोसायटी तांडा येथील. चारित्र्यावर संशय घेऊन वायरने गळा आवळून केला होता खून. 

नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन चक्क तिचा वायरने गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या पतीला व त्याच्या भावाला मुखेड येथील प्रथमवर्ग न्यायाधीश सतीश शिंदे यांनी मंगळवारी (ता. पाच) शनिवारपर्यंत (ता. नऊ) पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

मुखेड तालुक्यातील सोसायटी तांडा, शिकारा येथील संतोष जाधव (वय ३२) हा आपल्या परिवारासह राहतो. त्याच्या लग्नानंतर काही दिवस तो पत्नीसोबत चांगला राहू लागला. नंतरच्या काळात त्याने आपल्या पत्नी रेणूका (वय २७) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण करणे आणि अपमान करून तिचा शारिरीक व मानसिक छळ करणे सुरु केले. पतीचा होणारा त्रास तीने आपल्या माहेरी कळविला होता. तिच्या माहेरच्या मंडळीनीही संतोष जाधव याला समजावून सांगितले होते. परंतु त्याच्या वागण्यात काही बदल झाला नाही. रोज घरी आल्यानंतर पत्नीला मारहाण करीत असे.

हेही वाचानांदेडला दिलासा : बुधवारी ५३ नमुने अहवाल निगेटिव्ह

वायरने गळा आवळून निर्घृण खून

सोमवारी या दाम्पत्यामध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून चक्क संतोष जाधव याने रेणुका हिचा वायरने गळा आवळून निर्घृण खून केला. ही माहिती तिच्या माहेरी समजताच नातेवाईकांनी धाव घेतली. यावेळी मुखेड पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक श्री. अकुशकर यांनी घटनास्थळ गाठले होते. महिलेचा मृतदेह मुखेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता.  

नऊ मेपर्यंत पोलिस कोठडी

या प्रकरणी रामराव बळीराम राठोड रा. गोजेगाव (ता. मुखेड) यांच्या फिर्यादीवरुन पती संतोष रामराव जाधव आणि त्याचा भाऊ अनिल रामराज जाधव यांच्याविरुद्ध संगनमताने केलेल्या खूनाचा गुन्हा मुखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक नरसिंग अकुशकर यांनी आपल्या हातात तपास घेताच रात्रीच संतोष जाधव याला तर मंगळवारी सकाळी त्याचा भाऊ अनिल जाधव याला अटक केली. श्री. अकुशकर यांनी या दोघांना मुखेड न्यायालयासमोर हजर केले. प्रथमवर्ग न्यायाधीश सतीश शिंदे यांनी नऊ मेपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's murder: Husband and two others in police custody nanded news