
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून सुरु केले. पहिल्या टप्प्यात भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड, भोकर या तीन तालुक्यातील नागरिकांसाठी आहे. तर याच दिवशी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अर्धापूर येथील प्रशासकीय ध्वजवंदनास उपस्थिती लावून जनता दरबार घेवून मतदारांशी संपर्क केला.
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : लोकप्रतिनिधी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी व त्यांचे प्रश्न, सोडविण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत असतात. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अशोक चव्हाण सेवा सेतु नावाचे काॅल सेंटर प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून सुरु केले. पहिल्या टप्प्यात भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड, भोकर या तीन तालुक्यातील नागरिकांसाठी आहे. तर याच दिवशी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अर्धापूर येथील प्रशासकीय ध्वजवंदनास उपस्थिती लावून जनता दरबार घेवून मतदारांशी संपर्क केला. दोन्ही उपकृमांचा जनतेला किती फायदा होणार हे काळच ठरवील. पण सध्या मात्र दोन उपक्रमांची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.
पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना मॅनेजमेंट गुरु समजले जाते. त्यांच्याकडे समस्या, अडचणी घेऊन येणा-या नागरिकांची संख्या खूप मोठी असते. प्रत्येक नागरिकांना भेटने शक्य नसते. अशा वेळेला जनतेचा वेळ व पैसा वाचविण्यासाठी त्यांनी एक अभिनव असा उपक्रम पहिल्यांदाच सुरु केला आहे. अशोक चव्हाण सेवा सेतुच्या माध्यमातून काॅल सेंटरमधून जनतेचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. याचा शुभारंभ मंगळवारी (ता. 26) प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून करण्यात आले आहे. या आधी त्यांनी मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी जनसंपर्क कार्यालये सुरु केली आहेत.
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे विविध माध्यमातून जनतेच्या संपर्कात सातत्याने असतात. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. नांदेड लोकसभा निवडणूकीत माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा धक्कादायक पराभव केल्याने खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव देशभर चर्चेत आले. खासदार पाटील यांचा भोकर विधानसभा मतदार संघातील गावात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संपर्क असतो.
अर्धापूर तालुका निर्मितीनंतर तालुक्याच्या ठिकाणी होणा-या ध्वजवंदनाच्या सोहळ्यास खासदार उपस्थित राहणे ही पहिलीच घटना असल्यामुळे नागरिकात कुतूहलाचा विषय होता. तहसील कार्यालयाच्या मुख्य शासकीय ध्वजवंदनास उपस्थित राहून सभागृहात जनता दरबार घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील विभाग प्रमुख उपस्थित होते. नागरिकांनी रस्ते, ना दुरूस्त डीपी, निराधारांचे मानधन, किसान ऋण योजना, आरोग्य उपकेंद्रातील असुविधा, किसान रेल्वे योजना व घरकुलाचे थकीत हप्ते आदी समस्या मांडल्या. खासदरांनी या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला सुचना केल्या. तसेच किसान रेल्वेसाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील दोन्ही लोकप्रतिनिधी जनतेसाठी एक चांगला उपक्रम सुरु केला आहे. शासकीय काम आणि सहा महिने थांब अशी कार्यशैली निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा ईतकी निर्ढावलेली आहे. प्रत्यक्ष भेटून सुधा काम करीत नाहीत. छोट्या- छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयात खेटे मारावे लागतात शिवाय चिरिमिरी दिल्याशिवाय कामे होत नाहीत असे नागरिकांचा अनुभव आहे. या दोन्ही उपक्रमातून जनतेच्या समस्या सुटाव्यात हीच भावना सर्वसामान्यांची आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे