हिवाळा विशेष :  सुक्‍या मेव्याचे दर ३० ते ४० टक्क्याने उतरले

प्रल्हाद कांबळे
Sunday, 8 November 2020

वातावरणात थंडी हळूहळू वाढत आहे. तिकडे सततच्या पावसामुळे बाजारात भाजीपाल्याचे, गोड तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र थंडीच्या दिवसात सुका मेव्याची मागणी वाढते

नांदेड : यावर्षी सुरुवातीपासून पावसाने चांगली सुरवात केली. मात्र परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला. त्यातच कोरोनाचा फटका यामुळे सर्वचजण या संकटातून जात आहेत. त्यात आता हिवाळा सुरु झाला असून सुक्या मेव्याचे दर कमी झाले असून पहिलवान मंडळीना चांगली बातमी आहे. मात्र दर कमी होऊनही ग्राहक फिरकत नसल्याने व्यापारी हातावर हात देऊन बसले आहेत.

वातावरणात थंडी हळूहळू वाढत आहे. तिकडे सततच्या पावसामुळे बाजारात भाजीपाल्याचे, गोड तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र थंडीच्या दिवसात सुका मेव्याची मागणी वाढते. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या नागरिकांना सुकामेव्याच्या कमी झालेल्या दरामुळे दिलासा मिळाला आहे. सुक्या मेव्याचे दर ३० ते ४० टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा मुदखेड : पिस्तुलचा धाक दाखवून सराफाला लुटणारे पोलिस कोठडीत

अंजीर, खोबऱ्यामध्ये घट

हिवाळा सुरु झाला की सुक्यामेव्याची खरेदी केली जाते. यावर्षी कोरोना महाभयंकर संसर्गाच्या संकटात असताना परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला होता. बागायत शेती, शेतीमालाचे मोठे नुकसान झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले, मात्र सुक्यामेव्याच्या दर अर्ध्यापर्यंत कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कमी भावात सुकामेवा असला तरी खरेदी करणाऱ्यांची संख्या मात्र फार कमी असल्याचे व्यापारी सांगतात. यावर्षी अंजीर, खोब्रा, बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, मनुका आदीमध्ये दरात कमालीची घट झाल्याचे दिसून आले.

बिबा गोडंबी व खारीक महागले

गेल्यावर्षी बाजारात अंजिर बाराशे रुपये किलो होते तर यावर्षी सातशे ते आठशे रुपये आहेत. काजू मागील वर्षी ९०० ते ८०० रुपये प्रति किलो दर यावर्षी ७०० ते ६०० रुपये प्रतिकिलो, बदाम मागील वर्षी ९०० ते ८०० रुपये प्रति किलो तर यावर्षी पाचशे ते सहाशे रुपये प्रति किलो, खोबरा मागील वर्षी दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो या वर्षी १४० ते १३० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. मनुका, किस्मिस मागील वर्षी ३०० ते ४०० रुपये तर यावर्षी १३० ते २०० रुपये किलो, अक्रोड मागील वर्षी चौदाशे रुपये किलो दराने मिळत होते या वर्षी सातशे ते आठशे रुपये दराने मिळत आहे, फक्त यावर्षी बिब्याची गोडंबीचे भाव शंभर रुपये वाढले आहे. मागील वर्षी बिबा गोडंबी चारशे रुपये दराने मिळत होती मात्र पाचशे रुपये दराने मिळत आहे. खारीक मात्र यावर्षीपेक्षा महागले आहे. १०० ते १२५ रुपये किलो मिळणारी खारीक आता तीनशे रुपये दराने उपलब्ध आहे. खारीक सोडले तर सुकामेवातील सर्व वस्तूंचे दर कमी झाले आहेत. पण सध्या कोरोना महामारी व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांनी सुकामेव्याच्या दुकानाकडे पाठ फिरविल्याने व्यापारी ग्राहकांची वाट पाहत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter Special: Prices of dried fruits have come down by 30 to 40 per cent nanded news