महिलांनो सावधान : मोबाईल दुरुस्तीसाठी देत असाल, तर अशी घ्या काळजी...

प्रल्हाद कांबळे
Thursday, 6 August 2020

वकील महिलेलाच तिच्या डाटावरुन ब्लॅकमेल करणाऱ्या युवकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान व भारतीय दंड संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : मोबाईल दुरुस्तीसाठी दिल्यानंतर त्या मोबाईलमधील वैयक्तीक फोटो, व्हाटसअप संदेश, महत्वाचे क्रमांक आणि फेसबुकवरील संदेश आणि महत्वाचा डाटा मोबाईल दुरुस्तीवाल्या युवकांनी हॅक करुन घेतला. यानंतर वकील महिलेलाच तिच्या डाटावरुन ब्लॅकमेल करणाऱ्या युवकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान व भारतीय दंड संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २३ जूलै गणेशनगर वायपॉईन्ट येथे घडला. दुकानमालकाने त्या युवकास काढून टाकल्याचे सांगण्यात आले. 

शहराच्या गणेशनगर वायपॉईन्ट येथे राहणाऱ्या ॲड. आम्रपाली कुमठेकर यांचा मोबाईल नादुरुस्त झाला होता. यावेळी त्यांनी महात्मा फुले मार्केटमधील अरिहंत मोबाईल शॉपीवर जावून मोबाईल दुरुस्तीसाठी दुकानातील आशिष डावळे याच्याकडे दिला. त्याने मोबाईल दुरुस्त होण्यासाठी दोन दिवस लागतील असे सांगितल्यानंतर सदरची महिला निघून गेली. दोन दिवसांनी मोबाईल घेण्यासाठी आली. मोबाईल घेऊन ती निघून गेली. हा प्रकार ता. २३ जूलै रोजी घडला होता. 

कुटुंबाला ठार मारण्याची धमकी  

सदर महिलच्या मोबाईलमधील तिचा महत्वाचा डाटा, फेसबुक व व्हॉटसअपवरील संदेश आणि तिचे काही वैयक्तीक फोटो आपल्या मोबाईलमध्ये हॅक करुन घेतले. त्यानंतर त्या महिलेस तु मला जर बोलली नाहीस तर तुझा मोबाईल डाटा व्हाटसअपर व सोशल मिडीयावर टाकून व्हायरल करतो अशी धमकी दिली. त्यानंतर वकिल महिलेनी या प्रकरणाची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांचा फोन त्याला जाताच तो चवताळला. पुन्हा तिला धमकी देणे सुरू केले. पोलिसात माझ्याविरुद्ध तक्रार का दिली म्हणून तुझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. 

हेही वाचामाणुसकीचा ओलावा आटला : चक्क मुख्याधिकाऱ्यांनी दिला, वृध्देच्या प्रेताला खांदा

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

यानंतर मात्र नाहक त्रास देणाऱ्या आशिष डावळे विरुद्ध वकिल महिला अम्रपाली कुठेकर हिने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. ता. चार आॅगस्ट रोजी तिच्या तक्रारीवरुन आशिष डावळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा युवक हा दुकानावरुन काढून टाकल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अजूनतरी अडकला नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे करत आहेत. 

महिलांनो ही घ्या काळजी

मोबाईल आता प्रत्येक व्यक्तीचे जीवनावश्‍यक साधन झाले आहे. मोबाईल शिवाय सध्या तरी पासुद्धा हालत नसल्याचे दिसुन येते. गरीब ते श्रीमंतापर्यंत मोबाईल असतोच. त्या मोबाईलमध्ये आपले सर्व कागदपत्र, फोटो, वैयक्तीक माहिती तसेच संपर्क क्रमांक अपलोड करुन ठेवतो. यामुळे नादुरुस्त झालेला मोबाईल दुसुरस्तीसाठी दुकानावर देतांना आपला डाटा अगोदर आपल्या समोर काढून घ्यावा. तसेच आपल्या ओळखीच्या किंवा भरवश्‍याच्या दुकानावरच जावून दुरुस्ती करावी. जेणेकरुन आपल्या मोबाईल डाटाचा गैरवापर होणार नाही. याची महिलांसह सर्वच नागरिकांनी काळजी घ्या.

- अनंत नरुटे,पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे, नांदेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women, beware: if you are for mobile repair, then take care nanded news