बोगस खड्डेमुक्तीचा पॅटर्न आला उघडकीस

प्रभाकर लखपत्रेवार
Thursday, 14 May 2020

नायगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २०१९ पर्यंत तालुक्यातील १४ मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. हे काम करतांना अधिकाऱ्यांच्या अर्थिक फायद्याचे असलेल्या व काही मर्जीतील तर ज्यांचे पूर्व रेकॉर्ड अतिशय खराब असणाऱ्या कंत्राटदाराकडून कामे करून घेण्यात आली होती. त्यामुळे नायगाव तालुक्यातील बोगस खड्डेमुक्तीचा पॅटर्न चांगलाच गाजला. खड्डे बुजविण्याचे काम पुढे पाठ मागे सपाट झाल्याने कोट्यवधी रुपये खर्च होऊनही वाहनचालकांची खड्डे चुकवता चुकवता त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

नायगाव, (जि. नांदेड) ः नायगाव ते कोलंबी दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदरचे काम लालवंडीच्या नागरिकांनी बंद पाडले असले तरी कंत्राटदार मुजोरी करून काम चालूच ठेवले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कमालीचे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नायगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २०१९ पर्यंत तालुक्यातील १४ मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. हे काम करतांना अधिकाऱ्यांच्या अर्थिक फायद्याचे असलेल्या व काही मर्जीतील तर ज्यांचे पूर्व रेकॉर्ड अतिशय खराब असणाऱ्या कंत्राटदाराकडून कामे करून घेण्यात आली होती. त्यामुळे नायगाव तालुक्यातील बोगस खड्डेमुक्तीचा पॅटर्न चांगलाच गाजला. खड्डे बुजविण्याचे काम पुढे पाठ मागे सपाट झाल्याने कोट्यवधी रुपये खर्च होऊनही वाहनचालकांची खड्डे चुकवता चुकवता त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

नायगाव तालुक्यातील ज्या १४ मार्गांवर खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, त्या वेळी संबंधित कंत्रादाराकडून दोन वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचा करार करण्यात आला होता. पण कामे होऊन एकच वर्षच होत आले असतांना त्याच मार्गावर पुन्हा नव्याने तब्बल १२ कोटींचे खड्डे बुजविण्याचे कामे हाती घेण्यात आली आहेत. एकाच वर्षात नव्याने खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतले आहे, हे विशेष.

हेही वाचा -  मुलीला पाठविले बाहेर, केला तिच्या मैत्रीणीवर अत्याचार -

तीन दिवसांपासून नायगाव -लालवंडी- गोदमगाव- कोलंबी या दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या बाबत लालवंडीच्या ग्रामस्थांनी संबधित कंत्राटदाराला काम दर्जेदार करण्याबाबत विनंती केलेली असतांना या विनंतीकडे दुर्लक्ष करून थातूरमाथूर कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या लालवंडीच्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली. पण होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे एकही अधिकारी फिरकला नसल्याने या बोगस कामाला अधिकाऱ्यांचेच तर पाठबळ नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. याच कंत्राटदाराने कुंचेली येथेही अर्धवट व असेच खड्डे बुजविण्याचे काम केलेले आहे.

संबंधित कंत्राटदारला ज्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम देण्यात आले आहे, त्यांनाच दोन वर्षे देखभाल व दुरुस्ती करावयाची असून लालवंडीच्या कामाबाबत तक्रारी व कामाच्या फोटो आल्या आहेत. त्या कामाला भेट देऊन काम चांगले करण्याबाबत संबंधितांना सूचना देणार आहे. दिलेल्या सुचनेनंतरही कामाच्या दर्जात सुधारणा न झाल्यास काम बंद करू. 
- जी. डी. बारसकर, कनिष्ठ अभियंता, सां. बां. नायगाव.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Work Of Filling The Pits By The Contractor Is Bad, Nanded News