esakal | जागतीक पुस्तक दिन : पाचवीतील 'गौतमच्या कविता' आणि ५० हजारांचे बक्षीस!

बोलून बातमी शोधा

पुस्तक दिन
जागतीक पुस्तक दिन : पाचवीतील 'गौतमच्या कविता' आणि ५० हजारांचे बक्षीस!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गौतम पाटील हा मिरज तालुक्यातील समडोळीच्या जि. प. शाळा नं. १ चा विद्यार्थी. तो दुसरीत शिकत असल्यापासूनच कविता करायचा. शब्दांशी खेळण्याचा त्याला छंदच जडला होता. गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी लेखन कार्यशाळा घेतल्या. त्यातून जी मुले लिहिती झाली, त्यातील गौतम पाटील हा एक. शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी पाटील यांनी गौतमला लेखनासाठी प्रोत्साहन दिले.

कृष्णात पाटोळे यांनी गौतमच्या कवितेचा कोवळा कोंभ जपला, जोपासला. गौतमची मूळ प्रकृती अबोल, पण गुरुजनांच्या प्रेरणेने तो कवितेतून बोलू लागला. निसर्ग, पशुपक्षी यांच्याशी तो कवितेतून संवाद साधू लागला. मिरज तालुका शिक्षण विभागाने बालकुमारांची चार साहित्य संमेलने घेतली. त्यात गौतमने आपल्या कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या साहित्य संमेलनातही गौतमने आपल्या कवितेची चमक दाखविली.

२०१७-१८ ह्या शैक्षणिक वर्षात गौतम पाचव्या वर्गात शिकत होता. नामदेव माळी यांनी आपल्या सृजन प्रकाशनतर्फे दि. २० डिसेंबर २०१७ रोजी 'गौतमच्या कविता' हा संग्रह प्रकाशित केला. ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती दि. २५ फेब्रुवारी २०२० रोजी प्रकाशित झाली आहे. ३२ पृष्ठांच्या ह्या पुस्तकात गौतमच्या २८ कविता आहेत. यात विषयांची विविधता आहे. ह्या पुस्तकाला २०१७चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ५० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. पाचवीतल्या विद्यार्थ्याच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाला एवढा मोठा पुरस्कार मिळण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील कदाचित ही पहिलीच घटना असावी. त्या वर्षी अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची पुस्तके त्या स्पर्धेत असणार. गौतमने त्या सगळ्यांना मागे टाकून राज्य पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

हेही वाचा - विशेष स्टोरी : रमजानमध्ये खजूर खाऊनच का सोडतात रोजा?

'दुष्काळ' ह्या पहिल्याच कवितेत दुष्काळाची दाहकता वर्णन करून शेवटी गौतम

'सर्वांनी वाचवावे पाणी

पक्षी गातील गाणी'

हा पाणीबचतीचा संदेश देतो.

'झेंडा' ह्या कवितेत तो

'चला घेऊ झेंड्याची आन

चला वाढवू तिरंग्याची शान'

अशा शब्दांत राष्ट्रभक्तीची भावना जागवतो.

गौतम हा किसानपुत्र असल्यामुळे त्याला शेतीसाठी पाण्याचे महत्त्व माहीत आहे.

'पावसाळा' ह्या कवितेत तो लिहितो

'अशी पावसाने

केली कमाल

कष्टाळू शेतकरी

झाला मालामाल'.

गौतम हा विज्ञानाचा विद्यार्थी आहे. सजीवांच्या अन्ननिर्मितीतील सूर्यप्रकाशाचे स्थान तो जाणतो. म्हणूनच तो लिहितो

'झाडाचे अन्न सूर्यप्रकाश

सूर्याचे घर सुंदर आकाश'

'मासा' ह्या कवितेत गौतमने तारा मासा, शार्क मासा, व्हेल मासा, रंगीबेरंगी मासा अशी माशांच्या जगातील विविधता वर्णन केली आहे. आपला किरकोळपणा कबूल करताना तो म्हणतो

'तुमच्यात व्हेल

मासा मोठा

मी त्याच्यासमोर

उंदरासारखा छोटा'.

स्वतःची तुलना उंदराशी करताना त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही.

गौतमच्या कविमनाने विविध झाडांच्या पानांचे आकार अनुभवले आहेत. पानांवरच्या रेषा त्याला नद्यांसारख्या भासतात. म्हणून तो स्वतःलाच प्रश्न विचारतो

'पंचवीस नद्या एकाच पानात

तर किती नद्या सर्व पानात?'

घड्याळाचे तीन काटे म्हणजे त्याला ते घड्याळाचे तीन हात वाटतात.

'घड्याळाला असतात तीन हात

ते फिरतात दिन रात'.

अशी भन्नाट कल्पना तो करतो.

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. म्हणून तो लिहितो

'दिवाळीत सारे सुखी

कोणीच नसतात दु:खी'

किंबहुना कोणीच दु:खी राहू नये, अशी गौतमची अपेक्षा आहे.

पुस्तक हा गौतमचा सच्चा मित्र. अशा ग्रंथगुरूला देवाच्या ठिकाणी ठेवून त्यांची पूजा करतो.

'पुस्तक आपला सच्चा गुरू

आपण त्याची पूजा करू'.

गौतमला मातीची महती माहीत आहे. गौतमच्या कवितेतील खारूताई चुरुचुरू चरते. गौतम आपल्या कवितेत मिरचीताईचे लग्न लावून देतो.

ह्या कवितेतील वानराचे पिलू मुलांना चिडवते. गौतमच्या कवितेत फुलपाखरू फुलामुलांचा मित्र बनून अवतरते.

मराठी शाळेचा विद्यार्थी असलेल्या गौतमला मराठी भाषेचा रास्त अभिमान आहे. गौतमच्या कवितेतील पाऊस विविध रूपांत अवतरला आहे. गौतमच्या कवितेतील चिमणा चिमणी लग्न करून संसारात मग्न होतात. अभ्यासू गौतमला परीक्षेची मुळीच भीती नाही.

गौतमच्या कवितेतील वाघ, सिंह, ससा, हरीण, हत्ती, गेंडा, माकड, चिऊताई हे सगळे पशुपक्षी एकत्र येऊन वनभोजन साजरे करतात. तुरेवाला लाल कोंबडा आरवून गाव जागा करतो. गौतमच्या कवितेत निसर्गाचे विविध आवाज ऐकू येतात.

गौतमच्या कवितेत सूक्ष्म निरीक्षणशक्ती आहे, संवेदनशीलता आहे आणि सर्जनशीलता आहे. गौतमची कविता उगवतीच्या कोवळ्या किरणांसारखी लोभस आहे. प्रकाशकांनी आर्ट पेपरवर सचित्र छपाई करून पुस्तकाची उत्तम निर्मिती केली आहे. कृष्णात पाटोळे यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे अरुण सुतार यांनी सजविली आहेत.

- डाॅ. सुरेश सावंत यांच्या फेसबुकवरुन साभार