esakal | जागतीक वसुंधरा दिन : ओसाड पडतेय वसुंधरा; झाडांच्या बेसुमार कत्तली ः पाण्याचा अपव्यय आणि वायुप्रदूषणही

बोलून बातमी शोधा

जागतीक वसुंधरा दिन

जागतीक वसुंधरा दिन : ओसाड पडतेय वसुंधरा; झाडांच्या बेसुमार कत्तली ः पाण्याचा अपव्यय आणि वायुप्रदूषणही

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः आधुनिकतेकडे वाटचाल करतानाही वसुंधरेचे सौंदर्य दिवसेंदिवस हरवत चालले आहे. झाडांच्या बेसुमार कत्तली, पाण्याचा अपव्यय, वाहनांकडून होणारे वाढते वायुप्रदूषण अशा कितीतरी बाबी यास कारणीभूत ठरत आहेत. जागतिक वसुंधरा दिन गुरुवारी (ता. २२) जगभरात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने वसुंधरेला हिरवाईने नटविण्यासह सुजलाम सुफलाम बनविण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेणे उचित ठरेल.

वृक्षतोड थांबणे गरजेचे ः

शहरासह ग्रामीण भागात पूर्वी दिसून येणारी वनसंपदा आज तुरळक झाली आहे. कधीकाळी वृक्षवेलींनी युक्त जंगले ओसाड बनली आहेत. झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. अगदी फळांची झाडेही तोडली जात आहे. वसुंधरा वाचवायची असेलतर वृक्षतोड थांबणे आज काळाजी गरज बनली आहे.

हेही वाचा - वसमत शहरातील मटका बुक्कीवर कारवाई; ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त

जलस्त्रोतांची काळजी आवश्‍यक ः

उन्हाळा आला की पाण्याचे महत्त्व कळू लागते. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे जलस्त्रोतांची काळजी घेतली गेली पाहिजे. विविध जलसाठ्यांवर विद्युतपंप लावून होणारा अवैध पाणी उपसा रोखला गेला पाहिजे. नदी- नाल्यांमध्ये प्रचंड कचरा टाकला जातो. वाळूचा बेसुमार उपसा होतो, या बाबी थांबल्या तरच वसुंधरा टिकून राहील.

झाडे कशी वाचवता येतील? ः

झाडांना वाचविण्यासाठी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र, नागरिकांमध्ये जागृती करावी. एखादे झाड काढून टाकावयाचे असेल तर त्यामागे विविध कारणे असावी. झाडे मृत होणे, धोकादायक करणे, रोग लागणे, चुकीच्या ठिकाणी झाडाची वाढ झाली असेल तर ते कापावे. विनाकारण स्वार्थ साधण्यासाठी वृक्षतोड करु नये. वृक्षतोड होत असेल तर संबंधित वन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेला पत्र पाठवून त्याबद्दल कळवावे.

वसुंधरा वाचविण्यासाठी रोपलागवड एकमेव उपाय

प्राणवायू, पाणी आणि झाडांशिवाय पृथ्वीवर जगणे शक्‍य नाही. झाडे ही प्राणवायू आणि पाण्याचे स्त्रोत आहेत. झाडे आणि जंगले नष्ट करणे म्हणजे स्वतःचे जीवन नष्ट करण्यासारखे आहे. माणूस हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून निसर्गाची निगा राखावी. अधिकाधिक रोपलागवड हाच वसुंधरा वाचविण्यासाठी एकमेव उपाय असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.

वसुंधरेच्या संरक्षणासाठी हे करा...

- जलफेरभरण व्हावे.

- प्लास्टिकचा वापर टाळावा.

- शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.

- वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करावे.

- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा.

- वायूप्रदूषण रोखण्यासाठी शक्‍य तितका सायकलचा वापर करावा.

संपादन- प्रल्हाद कांबळे