esakal | जागतिक मराठी भाषा दिन विशेष : जागतिकीकरणात मराठी भाषा

बोलून बातमी शोधा

file photo}

यातून मराठी भाषेचे संवर्धन आणि महती वर्णन करणे आणि ती समृद्ध कशी होईल या दृष्टीने मंथन केले जाते. 

जागतिक मराठी भाषा दिन विशेष : जागतिकीकरणात मराठी भाषा
sakal_logo
By
विलास मा. गायकवाड

नांदेड : सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्‍मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने या दिनाला सुरुवात झाली ती मुळात भावी पिढीने मराठीचा-मातृभाषेचा वारसा पुढे नेटाने चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्‍वतपण टिकवावे या हेतूने. जगभरात हा दिन जिथे मराठी माणूस निवास करतो तिथे साजरा होतो. तसेच यानिमित्त मराठी भाषेला योग्य दिशा देण्यासाठी चर्चासत्रं, कार्यशाळा, मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्यसंमेलन, व्याख्याने, विविध स्पर्धा आदी विधायक उपक्रम राबविले जातात. यातून मराठी भाषेचे संवर्धन आणि महती वर्णन करणे आणि ती समृद्ध कशी होईल या दृष्टीने मंथन केले जाते. 

आपण वर्षभरात भाषा संवर्धन पंधरवडा, भाषा दिन आणि महाराष्ट्र दिन साजरे करतो. जी भाषा ‘अमृतातेही पैजा जिंके’अशी होती तिच्या शाळा आज बंद पडत आहेत. पदवी- पदव्युत्तरकडे मराठी विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस उतरत्या क्रमाकडे चालली आहे, ही नक्कीच चिंतनीय बाब म्हणावी लागेल. जागतिकीकरणात मराठी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील मराठी विभागाची स्थिती कशी असेल, हा प्रश्‍न ओघाने पुढे येतोच.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही सकळ मराठीजनाची मागणी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही सकळ मराठीजनाची मागणी असली तरी सध्या ती धूसर आहे. मराठी भाषा शाश्‍वत राहणे हे निव्वळ मराठी भाषा शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहाकरिता अनिवार्य नाही तर मराठीला ज्ञानभाषा बनविण्याकरिता कोश, सूची तसेच अनुवाद, संपादन, भाषा- साहित्यविषयक संशोधन, भाषा आणि तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमं, मनोरंजनमाध्यमं आदी क्षेत्रांसाठी आवश्‍यक आहे. अंतिमतः मराठी जगली तरच साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, मराठी वर्तमानपत्रं, आकाशवाणी- दूरचित्रवाहिन्यांना वाचक, प्रेक्षक, श्रोते मिळतील अन्यथा जागतिकीकरणाच्या वादळात मराठी भाषेची कालौघात परवड होईल हे मात्र नक्की!

मराठी भाषकांनी वैश्विकता स्वीकारावी

विश्‍वसंमेलनातूनही मराठी भाषेवर अनेकविध विषयांवर सखोल चिंतन होते; काही ठरावही होतात; पण त्यातून भाषा विकासाचे कार्य पुढे कितपत घडते, याकडे आपण गांभीर्याने बघत नाही. भाषा दिन आपण उत्साहात साजरा करतो; पण विशिष्ट वर्ग सोडला तर आपली भाषा सशक्त होईल याकडे वर्षभर डोकावून पाहत नाही. मराठीला ज्ञानभाषेचं वैभव प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर मराठी भाषकांनी वैश्विकता स्वीकारावी; पण आपली मुळं, आपली स्थानिक ओळख विसरु नये. त्यांनी आपापले ज्ञानविषय, संज्ञा- संकल्पना ही संपत्ती मराठीत आणावी. मराठी शिकावी लागेल अशी शासकीय धोरणं आखावीत आणि मराठी शिकावीशी वाटेल अशी व्यवस्था निर्माण करावी.

मराठी भाषा बलवत्तरकडून कमकुवततेकडे वळली 

जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नसेल तर ती ज्ञानभाषा कशी होईल? मग ती भाषा जागतिकीकरणात सुरक्षित तरी कशी राहील? स्वभाषेविषयीचे आपले प्रेम कायम असते ते फक्त भावनिक, प्रतीकात्मक पातळीवर राहते. कुठलीही भाषा स्वतः हून बलवत्तर किंवा कमकुवत नसते. आता मराठी भाषा बलवत्तरकडून कमकुवततेकडे वळली आहे. मराठी भाषेची जी परवड झाली आहे त्याला भाषा जबाबदार नसते तर भाषक जबाबदार असतात. आपल्यापैकी अनेकांना महत्त्वाच्या व्यवहारक्षेत्रात मराठी भाषा वापरण्याचा संकोच वाटतो. अभिजन वर्गाने मराठीकडे दुर्लक्ष केले आहे आणि बहुजनवर्गही त्या वाटेने मार्गस्थ होताना दिसत आहे.

मराठी माणूस जगभर पोचला आहे; पण मराठी भाषा मात्र पोचली नाही

मराठी माणूस व्यवसाय आणि नोकरीनिमित्त जगभर पोचला आहे; पण मराठी भाषा मात्र पोचली नाही, विस्तारला फक्त त्याचा व्यवसाय आणि त्याचे पद. त्यातील काही भारतीय अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आदी देशांतून आपला पेशा सांभाळून आपल्या राज्यातील प्रकाशकांसाठी स्वतंत्र लेखन वा अनुवादकीय काम करतात. यातून इतर भाषेतील नवनवीन विषयांचे ज्ञान मराठी वाचकाला मिळते; पण याद्वारे मराठीला किती बळ मिळते, याचा कुणीही विचार करत नाही. मराठीतील दर्जेदार साहित्यकृती तिकडे नेण्याचा ते मात्र प्रयत्न करीत नाही.

विद्यापीठांनी मराठी भाषा जगभर पोचवण्यात प्रयत्नशील व्हायला हवं

महाराष्ट्राव्यतिरिक्त देशात काही केंद्रीय विद्यापीठांत मराठी विभाग अस्तित्वात आहे. या विद्यापीठांनी मराठी भाषा जगभर पोचवण्यात प्रयत्नशील व्हायला हवं. इतर देशांत मातृभाषेला व्यवहार भाषा, आविष्कार भाषा, ज्ञानभाषा म्हणून स्थान आहे; पण आपल्याकडे तसे होताना दिसत नाही. मानवी समाजात भाषा प्रमाण व बोली या प्रकारांत बोलली जाते. बोलीभाषेतील जो सर्वत्र परिचयाचा होतो तेव्हा तो प्रमाणभाषेत येतो. साहित्यरुपाने मराठी बोली व प्रमाण भाषेने समृद्ध आहे. मराठी भाषेला मोठे करण्यात संत, पंत आणि तंत यांचे योगदान मोठे आहे. तसेच महाराष्ट्रातील साहित्यिकांचा जसा मोलाचा वाटा आहे तसाच सर्वसामान्यांचाही आहे. जागतिकीकरणात मराठी भाषा ताठमानेने कायम उभी राहील, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

शेवटी कवी सुरेश भट यांच्या शब्दांत

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।