यावर्षी हळद रुसली, व्यापारी हसला...का ते वाचा...?

file photo
file photo

नांदेड : अगोदरच शेतकरी दुहेरी संकटात असतांना पुन्हा तो कोरोनामुळे अधिकच खचला आहे. राज्यात आणि देशातील लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसायाला बसला आहे. तोंडावर आलेल्या खरीपाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत हळद विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. याचाच गैरफायदा हळद व्यापारी घेत आहेत. लिलावात हळदीचे बिट वाढवताना केवळ पाच ते १० रुपयाने बोली वाढवून शेतकऱ्यांची थट्टाच केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी प्रतिक्विंटल केवळ चार ते साडेचार हजार इतकाच दर पडत आहे. दहा वर्षातील हळदीला मिळणारा हा निचांकी भाव आहे.

हळद हे पीक प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने आणि औषधी निर्मितीसाठी उपयुक्त असणारे नगदी पिक आहे. हळद हे ऊसाला पर्यायी पीक असून हळदीचे पीक ऊसापेक्षा कमी पाण्यावर येणारे पीक आहे. त्यामुळे शेतकरी हळदीची लागवड करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हे पीक घेतले जाते. हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत साधारणपणे १० ते ११ महिन्याचा कालावधी या पिकासाठी लागतो.

हेही वाचा - Video : सैनिकाचा उत्साह, उमेद देउन गेली अनेकांना मदत, वाचा अशीही देशभक्ती
 
हळद पिकाला किमान सात ते आठ हजार भाव मिळावा

सामान्यपणे लागवड ते काढणीपर्यंतचा सरासरी एकरी खर्च ५० ते ६० हजारापर्यंत येतो. यामध्ये बियाणे खरेदी, लागवड, खते, औषधी फवारणी, मजुरी , काढणी आणि हळद काढल्यानंतर शिजवणे तसेच फिनीशिंग प्रक्रियेपर्यंतचा खर्च समाविष्ट आहे. जर हळदीचे चांगले उत्पन्न झाले तर ते एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत मिळते. साधारणपणे प्रत्येक क्विंटलला तिन हजार लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च येतो. वरील सर्व गणित विचारात घेतले तर हळद पिकाला किमान सात ते आठ हजार भाव मिळाला तरच हे पिक शेतकऱ्यांना परवडण्या योग्य आहे. अन्यथा त्यापेक्षा कमी भाव म्हणजे उत्पादन खर्चही निघत नाही.

यंदा हळदीला दहा वर्षांतील निचांकी दर

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचे संकट हळदीचे दर उतरण्याचे प्रमुख कारण आहे. परंतू व्यापारी मात्र याचा गैरफायदा घेत आहेत. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची गरज लक्षात घेता व्यापारी हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूटच करत असल्याचे चित्र आहे. हरभरा, सोयाबीन, तूर, मूग उडीद या कमी कालावधीच्या पिकांपेक्षा हळदीला कमी भाव मिळत आहे. यंदा हळदीला दहा वर्षांतील निचांकी दर मिळत असून शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड होऊन बसल्याचे हळद उत्पादक शेतकरी अंकुश पाटील कोकाटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com