नवा चित्रपट : लव्ह आज काल २ : गहिऱ्या प्रेमाची भावुक गोष्ट

महेश बर्दापूरकर
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

इम्तियाज अली या दिग्दर्शकाची गोष्ट सांगण्याची एक विशिष्ट शैली आहे. तो कथा थेट, सरळधोपपणे सांगत नाही. त्याचं प्रत्येक पात्र स्वतःचा प्रवास, त्याचे विचार, त्याच्या समस्या घेऊन येतं. त्यातून तुम्ही नक्की काय घ्यायचं हे दिग्दर्शक स्पष्ट करीत नाही, तो निर्णय तुमच्यावर सोपवून देतो. ‘लव्ह आज कल २’ या प्रेमाची गहिरी गोष्ट सांगणाऱ्या चित्रपटामध्येही दिग्दर्शक हाच प्रयोग करतो.

इम्तियाज अली या दिग्दर्शकाची गोष्ट सांगण्याची एक विशिष्ट शैली आहे. तो कथा थेट, सरळधोपपणे सांगत नाही. त्याचं प्रत्येक पात्र स्वतःचा प्रवास, त्याचे विचार, त्याच्या समस्या घेऊन येतं. त्यातून तुम्ही नक्की काय घ्यायचं हे दिग्दर्शक स्पष्ट करीत नाही, तो निर्णय तुमच्यावर सोपवून देतो. ‘लव्ह आज कल २’ या प्रेमाची गहिरी गोष्ट सांगणाऱ्या चित्रपटामध्येही दिग्दर्शक हाच प्रयोग करतो. आपण आयुष्यात जसं जगायचं ठरवतो, तसंच जगत नाही. अनेक चुका करीत जातो, मात्र त्यातून शिकायचं की नाही हा खरा मुद्दा असतो. हे करिअर, वैयक्तिक आयुष्य व प्रेमाच्या बाबतीतही खरं असल्याचं लेखक-दिग्दर्शकाला उलगडून दाखवायचंय आणि तो त्यात यशस्वी होतो. मात्र, ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट थेट मनोरंजन करणारा नाही, तो संथ आहे आणि त्यातील पात्रंही समजून घ्यावी लागतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘लव्ह आज कल २’ची कथा दोन समांतर पातळ्यांवर चालते. यातील १९९०मध्ये घडणाऱ्या कथेत रघू (कार्तिक आर्यन) हा उदयपूर शहरात राहणारा तरुण लीना (आरुषी शर्मा) या तरुणीच्या प्रेमात पडलाय. मात्र, गावात प्रेमाची होणारी अतिरंजित चर्चा आणि सामाजिक दबावाचे हे दोघं बळी ठरतात. आजच्या जमान्यात राहणाऱ्या वीर (पुन्हा कार्तिक आर्यन) आणि झोई (सारा अली खान) यांना मात्र ही समस्या नाही. एका वर्क स्टेशनमध्ये बसून काम करताना त्यांची ओळख होते. या कॅफेचा मालक (रणदीप हुडा) झोईला त्याच्या प्रेमाची गोष्ट सांगताना आपल्याही आयुष्यात असाच रोमान्स हवा असं तिला वाटतं. मात्र करिअरलाही तेवढंच महत्त्व देणारी, पैसा महत्त्वाचा असल्याचा संस्कार झालेली आणि हवं तसं जगण्यासाठी कोणाशीही संघर्ष करायला तयार असणारी झोई वीरबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल साशंक असते. वीरचा प्रेमावर विश्‍वास आहे. आज प्रेम आहे, तर ते करावं. उद्या कधीतरी आपण आणि हे जगही संपणारच आहे. त्यामुळं त्याचा विचार करून आजचा बळी देण्यात त्याला रस नाही. या गोष्टीवरून वीर आणि झोईमध्ये संघर्ष सुरू राहतो. १९९०मध्ये घडणाऱ्या समांतर कथेत प्रेमावर समाजाच्या दबाव आहे, तर आजच्या प्रेमावर करिअरचा. यातून हे जोडपं नक्की कसा मार्ग शोधतं याची काही उत्तरं सांगणारी, बरीच तुम्हाला शोधण्यासाठी ठेवणारी ही कथा फारशी खिळवून ठेवत नसली, तरी अंतर्मुख नक्कीच करते.

कथा आधीच्या पिढीकडून तुम्ही काय  शिकाल, हे आजच्या पिढीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षक म्हणून तुम्ही लेखक-दिग्दर्शक उलगडून दाखवत असलेल्या या तुलनेतून तुम्हाला हवं ते वेचणं अपेक्षित आहे. यात तुम्हाला रस नसल्यास तुम्ही कथेपासून तुटत जाता. त्यामुळं तुम्ही इम्तियाज अलीच्या कथा सांगण्याच्या पद्धतीचे फॅन असल्यासच तुम्हाला हा प्रवास भावतो. 

कार्तिक आर्यनच्या वाट्याला नव्वदच्या दशकातली गुलछबू आणि आजच्या काळातील परिपक्व प्रियकर अशा दुहेरी भूमिका आल्या आहेत. त्या त्यानं मनापासून साकारल्या आहेत. मात्र, काही भावुक प्रसंगांत त्याचा अभिनय ओढून-ताणून झाला आहे. सारा अली खाननं साकारलेल्या झोईच्या भूमिकेला अनेक पदर आहेत आणि ते तिनं ताकदीनं उलगडून दाखवले आहेत. नवोदित अभिनेत्री आरुषी शर्मानंही छोट्या भूमिकेत चांगला प्रभाव पाडला आहे. रणदीप हुडा वेगळ्या भूमिकेत भाव खाऊन जातो. प्रीतमच्या संगीतात फारसं नावीन्य नाही. 

एकंदरीतच, दिग्दर्शकानं प्रेमाची गोष्ट सांगताना केलेला हा प्रयोग वेगळा आहे. करिअर, नाती आणि प्रेम सांभाळताना ओढाताण होणाऱ्या आजच्या पिढीला यातून घेण्यासारखं बरंच काही आहे. मात्र, ते स्वतः शोधून घेण्याची इच्छा असल्यास हा प्रयोग तुमच्यासाठी आहे, अन्यथा... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New movie love aaj kal 2 entertainment