नवा चित्रपट : विकून टाक : सामाजिक संदेश आणि मनोरंजनही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikun-Tak

चित्रपटांतून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर पाटील ‘विकून टाक’ चित्रपट घेऊन आले आहेत. त्यांनी ‘पोश्‍टर बॉईज’ व ‘पोश्‍टर गर्ल’ यांसारख्या चित्रपटांतून मनोरंजन करताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करता करता चांगला संदेश दिला आहे.

नवा चित्रपट : विकून टाक : सामाजिक संदेश आणि मनोरंजनही

चित्रपटांतून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर पाटील ‘विकून टाक’ चित्रपट घेऊन आले आहेत. त्यांनी ‘पोश्‍टर बॉईज’ व ‘पोश्‍टर गर्ल’ यांसारख्या चित्रपटांतून मनोरंजन करताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करता करता चांगला संदेश दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘यलो’सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त, तसेच ‘बालक पालक’ व ‘डोक्‍याला शॉट’ असे चित्रपट बनविणाऱ्या उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा धामणगावात घडते. मुकुंद तोरांबे ऊर्फ मुक्‍या (शिवराज वायचळ) आणि कान्या (रोहित माने) हे दोन जीवलग मित्र. मुक्‍या दुबईहून आपल्या गावात परततो. त्याच्या आईने, म्हणजे यमुनाबाईने (वर्षा दांदळे) त्याचे लग्न ठरविलेले असते. मुक्‍याला लग्नाच्या दिवशीच बॅंकेची नोटीस येते. त्याच्या वडिलांनी कर्ज घेतलेले असते. ही बाब मुलीकडील मंडळींना समजल्यावर ते लग्न लावण्यास नकार देतात. साहजिकच मुक्‍या, त्याची आई, बहीण तसेच मित्र कान्या गोंधळात पडतात.

काय करावे आणि कसे करावे हेच त्यांना सुचत नाही. त्याच वेळी त्याचा मित्र कान्या त्याला धीर देतो. कान्याचे भंगार विकण्याचे दुकान असते, तेथे मुक्‍या जातो आणि रात्री पार्टी करीत असताना एक घटना घडते व कथानक वेगळे वळण घेते. पोलिस इन्स्पेक्‍टर डोंगरे (ऋषिकेश जोशी) मुक्‍याच्या मागे लागतात. अब्दुल लतीफ (चंकी पांडे) दुबईतून या गावात येतो आणि सगळा उंदीर-मांजराचा गमतीशीर खेळ सुरू होतो. 

दिग्दर्शक समीर पाटीलने ही कथा हलक्‍याफुलक्‍या पद्धतीने मांडलेली आहे. चंकी पांडेचे मराठीतील पदार्पण नक्कीच यशस्वी झालेले आहे. त्यांनी अब्दुल लतीफच्या भूमिकेत वेगळीच मजा आणली आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे चित्रपटातील गंमत अधिक वाढते आणि त्या भूमिकेबद्दलची उत्सुकता ताणली जाते. शिवराज वायचळ, राधा सागर, समीर चौघुले, रोहित माने, ऋषिकेश जोशी, जयवंत वाडकर, ऋतुजा देशमुख, राधा सागर अशा सगळ्याच कलाकारांनी छान अभिनय केला आहे. रोहित माने कमालीचा भाव खाऊन गेला आहे. नकारात्मक पण विनोदी अंगाने जाणाऱ्या पोलिस इन्स्पेक्‍टर डोंगरेची व्यक्तिरेखा ऋषिकेशने लीलया साकारली आहे. या भूमिकेचे बेअरिंग त्याने बरोबर पकडले आहे. चित्रपटातील गाणीही दमदार आहेत, सिनेमॅटोग्राफर सुहास गुजराथीने आपली कामगिरी चोख केली आहे. मात्र, कथा नको तितकी ताणण्यात आली आहे. कोर्टातील दृश्‍ये ‍खूपच लांबतात. शेवट मात्र चांगला सामाजिक संदेश देऊन होतो. सामाजिक विषयावर भाष्य करणारा आणि त्याचबरोबर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.