Navratri Festival 2019 : पतीचा व्यवसाय सांभाळून कुटुंबाला सावरले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

महिलांसाठी अनुभवाचे बोल

  • वाईट प्रसंग नशिबात असतातच, खचून जाऊ नका.
  • मनाने ठरवले तर महिला परिस्थिीवर मात करू शकते
  • अनेक अडचणी आल्या तरी सामना करा
  • कुटुंबाचा आधारवड म्हणून जबाबदारी पार पाडा
  • आपले कष्ट मुलांना प्रेरणा देऊ शकतात

लग्नानंतर संसार सुखात घालवायचे असे स्वप्न उराशी बाळगले; परंतु नियतीला हे मान्य झाले नाही. दोन वर्षांच्या कालावधीतच पतीला अर्धांगवायू झाला आणि जीवनातल्या संघर्षाला सुरवात झाली. पतीचा कापड दुकानाचा व्यवसाय होता. मुलाचे वय दहा महिने असताना पतीला आजार झाल्याने पुणे येथे औषधोपचार करावा लागला. त्यातच त्यांच्या हृदयाचा केवळ वीस टक्के भागच चालत असल्याचे समजले. 

पतीच्या दुहेरी आजाराने त्यांचे आयुष्य अल्पकाळ असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर काही काळ खचले; परंतु तीन वर्षे मला माझ्या सासर व माहेरच्या माणसांनी मदत केली. त्या नंतर मी स्वतः हिमतीने कापड विक्री व्यवसाय सांभाळायला सुरवात केली.

पतीची सेवा आणि व्यवसाय सांभाळणे अशी कसरत करावी लागली. औषधोपचार, घरखर्च व मुलाचे शिक्षण असल्याने आर्थिक परिस्थिती खालावली; परंतु पतीचा व्यवसाय नव्या उमेदीने चालू ठेवला. वस्त्र खरेदी करण्यासाठी स्वतः अमरावती, मुंबई या ठिकाणी जात असे. कापडांचे लहानमोठे गठ्ठे स्वतः बसस्थानकावरून दुकानात घेऊन येण्यापासून त्यांचे वर्गीकरण व मांडणी करण्यापासून विक्री करण्याचे काम स्वतः केले. ग्राहकांच्या पसंतीनुसार व्यवसायाची पद्धत ठेवली आणि चिकाटीने व्यवसाय केला. दररोज बारा तास व्यवसायाला वेळ देऊन व्यवसाय वाढवला. असंच काहीसं व्यवस्थित जीवनाचा गाडा चालत असतानाच सहा महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाले.

पर्याय नसल्याने दु:ख विसरावे लागले आणि महिनाभरात पुन्हा व्यवसायाकडे वळले. सध्या कापड व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत आहे. मुलगा पुणे येथे सीएच्या अंतिम परीक्षेची तयारी करीत आहे. पतीची प्रेरणा मिळाल्याने आज सक्षमपणे व्यवसाय करते.

व्यवसायातून चार कुटुंबांना रोजगार मिळवून दिल्याचा आनंद वाटतो. सामाजिक बांधिलकी जोपासत दोनशे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Business Employment Aarti Gadewar Success Motivation