Navratri Festival 2019 : आई राजा उदो-उदोच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना

जगदीश कुलकर्णी
Sunday, 29 September 2019

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सवाद्य मिरवणुकीने गोमुख तीर्थकुंडापासून जलकुंभाची मिरवणूक काढण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या सिंहाच्या गाभाऱ्यात जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर समितीच्या अध्यक्ष दिपा मुधोळ- मुंडे, त्यांचे पती विश्वास मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.

तुळजापूर : आई राजा उदो- उदोच्या जयघोषात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सवास रविवारी (ता. 29) उत्साहात प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मंदिरात घटस्थापना करण्यात आली. 

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सवाद्य मिरवणुकीने गोमुख तीर्थकुंडापासून जलकुंभाची मिरवणूक काढण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या सिंहाच्या गाभाऱ्यात जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर समितीच्या अध्यक्ष दिपा मुधोळ- मुंडे, त्यांचे पती विश्वास मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर मल्हारी म्हाळसाकांत, येमाई मंदिरात घटस्थापना झाली. तुळजाभवानी मातेचे भोपे पुजारी मुकुंद संभाजीराव कदम यांनी तुळजाभवानी मातेची घटस्थापनेपूर्वी पूजा केली. तुळजाभवानी मातेस नैवेद्य दाखविल्यानंतर पंचारती, धुपारती झाली.

मंदिरात अंगारा मिरवणूक झाल्यानंतर जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी ब्राह्मणांना नवरात्रासाठी वर्णी दिली. त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपती संस्थानतर्फे प्रतिपचंद्र प्रयाग व मंदा प्रयाग, हैदराबादच्या रावबहाद्दूर संस्थानतर्फे प्रसन्नकुमार कोंडो व गीता कोंडो यांनी ब्राह्मणांना  वर्णी दिली. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, तुळजाभवानी मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे,  तुळजाभवानी मातेचे महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri festival begins Ghat Satapna in Tuljapur