Navratri Festival 2019 : नवरात्रोत्सव आजपासून

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

नवरात्रोत्सवासाठी शहरातील विविध मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. घटस्थापनेसाठी आवश्‍यक असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शनिवारी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. या महोत्सवात दांडिया, गरबाचा नाद घुमणार आहे.

पुणे - नवरात्रोत्सवासाठी शहरातील विविध मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. घटस्थापनेसाठी आवश्‍यक असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शनिवारी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. या महोत्सवात दांडिया, गरबाचा नाद घुमणार आहे.

घटस्थापनेने रविवारी (ता. २९) सकाळी साडेसात वाजता या उत्सवाला सुरवात होणार आहे. चतुःशृंगी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात यानिमित्त चांदीचे छत बसविण्यात आले आहे. या आनंदोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड असावी म्हणून श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी तीन लाख रुपयांचा निधी दिला आहे. 

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने श्री महालक्ष्मी मंदिरात ८ ऑक्‍टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात केरळ येथील पद्मनाभन मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. महिला पोलिस, दिव्यांग शिक्षिका, महिला सफाई कामगार, वीरमाता-वीरपत्नी, महिला खेळाडू यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे, तर रोषणाईचे उद्‌घाटन पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते होणार आहे. दांडिया व गरबासाठी आवश्‍यक असलेले दागिने व घागरे यासह विविध कपड्यांची बाजारपेठेत झगमग दिसू लागली आहे. ते खरेदी करण्यासाठी युवक-युवतींची बाजारात लगबग सुरू आहे.

फॅशनची नवलाई
या उत्सवात फॅशनची नवलाई दिसून येत आहे. कमी वजनाच्या दागिन्यांना युवतींची पसंती मिळत आहे. गोल्डन, ऑक्‍साइड, कच्छी, राबेरी, काचेचे मणी, मेटल इत्यादी दागिन्यांची खरेदी युवतींकडून होत आहे. झुब्यांची क्रेझ यंदाही कायम असून, मोती लावलेले झुबे युवतींच्या पसंतीस उतरत आहेत. राजस्थानी स्टाइलच्या लाखेच्या गोंडे लावलेल्या बांगड्यांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दांडिया खेळण्यासाठी आवश्‍यक असलेले कपडे आणि ज्वेलरीचे विविध पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या किमती मात्र वाढल्या आहेत. तरुणाईसाठी नवरात्र हा आनंदोत्सव असतो. 
-सोना भुतडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Navratrotsav